गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. काँग्रेसने १९८५ साली एकूण १८२ पैकी १४९ जागा एकट्याने जिंकल्या होत्या. काँग्रेसचा हा विक्रम आगामी निवडणुकीत मोडीत काढण्याच्या संकल्प भाजपच्या नेत्यांनी बांधला असला तरी वास्तवातील चित्र वेगळे आहे. राज्यातील भाजप अनेक आव्हानांना तोंड देत आहे. मुख्य म्हणजे ब्रॅण्ड मोदी फिका न पडता अधिक झळाळून कसा निघेल, याची चिंता भाजपला सतावत आहे.
पंतप्रधान ‘फ्रंटफूटवर’
इतर राज्यांत राजकीय समीकरणे आणि निवडणुकीची तयारी यावर लक्ष ठेवण्यासाठी भाजपमध्ये पर्यवेक्षक नियुक्त केला जातो; परंतु एकमेव गुजरातमध्ये असे कुणीही नियुक्त केलेले नाही. संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळणारे नेते तसेच निवडणुकीची तयारी करणारा मंत्री आणि खासदारांचा गट थेट पंतप्रधानांच्या संपर्कात आहेत. अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला आणि मनसुख मांडवीय यांच्याकडेही इतर जबाबदाऱ्या दिल्या आहेत.
भाजपपुढील प्रमुख आव्हाने
सत्ताविरोधी जोरदार लाट : सतत २५ वर्षे एकाच पक्षाची सत्ता आहे. त्याविरोधात मोठी लाट (अँटी इन्कम्बन्सी) जनतेत आहे. त्यावर मात करावी लागणार आहे.
पक्षाकडे चेहरा नाही : नरेंद्र मोदी केंद्रीय राजकारणात गेल्यापासून त्यांची जागा भरून काढू शकणारे नेतृत्व तयार होऊ शकले नाही. राज्यात पक्षाकडे कोणताही चेहरा नाही.
पक्षांतर्गत कलह : भाजपमधील अंतर्गत कलह आणि कुरबुरींमुळे नवी संकटे निर्माण झाली आहेत. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्यातील शीतयुद्धाचा फटका पक्षाला बसू नये याची काळजी घेतली जात आहे.
काँग्रेसची वाढलेली ताकद : २०१७ नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी असताना झालेल्या निवडणुकीत भाजपला मार खावा लागला. काँग्रेसच्या जागा ७७ पर्यंत पोहोचल्या होत्या. गेल्या तीन दशकातील काँग्रेसची ही उत्तम कामगिरी होती. हा निराशाजनक इतिहास पुसून टाकण्यासाठी मोदींना पुन्हा एकदा मोठा विजय मिळवायचा आहे. अन्यथा मोदींच्या एकूणच कारकिर्दीला ग्रहण लागणार आहे.