विशाखापट्टण: भारत-चीन आणि भूतानच्या सीमा जेथे मिळतात त्या सिक्किमलगतच्या डोकलाम तिठयावरून भारत आणि चीन यांच्यात सध्या सुरु असलेल्या तिढयामुळे एव्हरेस्ट या जगातील सर्वात उंच पर्वतशिखराची उंची पुन्हा एकदा मोजण्याची नियोजित योजना रखडल्याचे दिसते.एव्हरेस्ट शिखराची सध्याची मान्यताप्राप्त उंची ८.८४० मीटर असून ती मोजदाद सर्व्हे आॅफ इंडियाने सन १९५५ मध्ये केली होती. २५ एप्रिल २०१५ रोजी नेपाळमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे हिमालयात झालेल्या उद्रेकांनी कदाचित एव्हरेस्ट शिखराच्या उंचीतही फरक पडला असावा, अशी शंका जागतिक वैज्ञानिक समुदायाने व्यक्त केली.या शंकेचे निरसन करण्यासाठी सव्हे आॅफ इंडियाने यंदाच्या त्यांच्या २५० व्या वर्धापनदिनाचे निमित्त साधून एव्हरेस्टच्या उंचीचे पुन्हा एकदा मोजमाप करून खातरजमा करून घेण्याची एक योजना आखली. एव्हरेस्ट शिखर नेपाळमध्ये असल्याने यासाठी त्या देशाची संमती व सहकार्य घेणे क्रमप्राप्त होते. तसा प्रस्ताव भारताने परराष्ट्र मंत्रालयामार्फत नेपाळकडे पाठवून तीन महिने उलटले तरी काठमांडूकडून अद्याप उत्तर मिळालेले नाही. भारताचे सव्हेअर जनरल आणि सव्हे आॅफ इंडियाचे प्रमुख मेजर जनरल व्ही. पी. श्रीवास्तव म्हणाले की, नेपाळकडून कोणतेच उत्तर न आल्याने या मोहिमेत पुढे काहीच प्रगती झालेली नाही.ज्यांच्या काळात नेपाळकडे प्रस्ताव पाठविला गेला ते याआधीचे सव्हेअर जनरल स्वर्ण सुब्बा राव ३० जून रोजी निवृत्त झाले. राव म्हणाले की, सध्याची तणावाची स्थिती पाहता नेपाळ या प्रस्तावाला उत्तर देण्यासाठी सावधपणे वेळ घेत असावा, असे वाटते. कदाचित भारताशी सहकार्य केले तर चीन नाराज होईल, अशी चिंता नेपाळला वाटत असावी.>पाच कोटींचा खर्चएव्हरेस्ट शिखराच्या उंचीची फेरमोजणी करण्याच्या या योजनेस पाच कोटी रुपये खर्च येईल, अशी अपेक्षा आहे. हे काम सर्व्हे आॅफ इंडिया करणार असले तरी खर्च विज्ञन आणि तंत्रज्ञान मंत्रालय करणार आहे. यासाठी भारत व नेपाळचे सर्व्हेअर व काही अनुभवी शेरपा असे मिळून ३० जणांचे पथक कामाला लावायची योजना आहे.
एव्हरेस्टची फेरमोजणी ‘डोकलाम’मुळे रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 4:42 AM