नवी दिल्ली : जगातील सर्वात उंच पर्वतशिखर म्हणून ओळख असलेल्या ‘माउंट एव्हरेस्ट’ची नव्याने मोजणी करण्यासाठी सहकार्य करण्याचा भारताचा प्रस्ताव नेपाळने अमान्य केला असून हे काम स्वत:च करण्याचे हिमालयातील या देशाने ठरविले आहे.एव्हरेस्ट शिखर नेपाळ व चीनच्या सीमेवर आहे. सन २०१५ मध्ये नेपाळमध्ये व हिमालयाच्या मोठया परिसरात ७.८ रिश्चर क्षमतेचा प्रलंयंकारी भूकंप झाल्यानंतर त्यामुळे कदाचित एव्हरेस्टही खचले असावे, अशी शंका वैज्ञानिकांच्या वर्तुळात व्यक्त केली गेली. त्या पार्श्वभूमीवर भारताच्या ‘सर्व्हे आॅफ इंडिया’ने एव्हरेस्टची एकत्रित फेरमोजणी करण्याचा प्रस्ताव केला होता.नेपाळच्या सवेक्षण विभागाचे महासंचालक गणेश भट्टा यांनी टेलिफोनवरून सांगितले की, फेरमोजणीच्या कामाच्या संदर्भात अलीकडेच आम्ही काठमांडूमध्ये विविध देशांचे सर्व्हेअर व वैज्ञानिकांची बैठक घेतली. त्या बैठकीला भारताचा प्रतिनिधीही हजर होता व त्याने या कामात मदत करण्याचा औपचारिक प्रस्तावदिला. मात्र आम्ही हे काम स्वत:च करणार असल्याचे बैठकीत आम्ही स्पष्ट केले.या कामी चीनचीही प्रत्यक्ष मदत घेतली जाणार नाही. मात्र यापूर्वी ज्यांनी एव्हरेस्टची मोजणी केली आहे त्यांच्याकडून त्यांचा ‘डेटा’ मात्र आम्ही संदर्भासाठी जरूर घेऊ, असेही भट्टा यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)
एव्हरेस्टची फेरमोजणी नेपाळ एकटेच करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 3:57 AM