निर्मला सीतारामनांनी केलं रॉबर्ट वाड्रांचं नामकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 04:44 PM2019-01-04T16:44:56+5:302019-01-04T16:48:05+5:30
राहुल गांधींच्या 'AA'ला सीतारामन यांचं 'RV'नं प्रत्युत्तर
नवी दिल्ली: प्रत्येक 'AA'साठी 'RV' आहे, असं म्हणत संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. काँग्रेसनंराफेल डीलवरुन केलेल्या आरोपांना सीतारामन यांनी आज लोकसभेत उत्तर दिलं. त्यावेळी त्यांनी कोणाचंही नाव न घेता, फक्त आद्याक्षरांचा वापर करत राहुल गांधींवर निशाणा साधला.
'प्रत्येक 'AA' साठी 'RV' नव्हेच तर 'Q' देखील आहे. विनोद करण्यासाठी आद्याक्षरांचा वापर करणं सोपं आहे. मात्र ही दुधारी तलवार आहे. त्यानं तुमच्यावरदेखील वार होऊ शकतो,' असा शब्दांमध्ये सीतारामन यांनी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला. 'RV' हे पंतप्रधानांचे जावई नव्हते, तर संपूर्ण देशाचे जावई होते, असा टोलादेखील त्यांनी लगावला. सीतारामन यांनी रॉबर्ट वाड्रांच्या नावांच्या आद्याक्षरांचा वापर करत काँग्रेसला लक्ष्य केलं. रॉबर्ट वाड्रा हे सोनिया गांधींचे जावई आहेत. गुरुग्राममधील अनेक वादग्रस्त जमिनीच्या व्यवहारांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे आरोप भाजपाकडून करण्यात आले आहेत.
Defence Minister in Lok Sabha: Congress did not intend buying the jets . For every 'AA' there is a 'Q' and 'RV'. #Rafalepic.twitter.com/h19l8BCnju
— ANI (@ANI) January 4, 2019
बुधवारी संसदेत राफेल डीलवर बोलताना राहुल गांधींनी मोदी सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला. त्यावेळी राहुल यांनी राफेल डीलमधील उद्योगपती अनिल अंबानी यांच्या नावाचा उल्लेख केला. मात्र सभागृहाचे सदस्य नसलेल्या व्यक्तींचं नाव सदनात घेता येत नाही, या नियमाची आठवण लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी त्यांना करुन दिली. यानंतर राहुल यांनी अनिल अंबानी यांच्या नावाचं आणि आडनावाचं आद्याक्षर वापरलं आणि 'AA' असा उल्लेख करत राफेल डीलवरुन सरकारला लक्ष्य केलं.