- नितीन अग्रवालनवी दिल्ली : महाराष्ट्रात ५ वर्षांच्या आतील मुले गंभीर रूपात कुपोषणाचे बळी ठरत आहेत. यामुळे प्रत्येक तिसऱ्या मुलाची उंची आणि वजन कमी आहे, तर प्रत्येक चौथा मुलगा सामान्यापेक्षा जास्त दुबळा आहे. मात्र, गेल्या ४ वर्षांत ही स्थिती काहीशी सुधारली आहे.
महिला व बालविकास मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार, मुलांमध्ये सर्वाधिक बुटकेपणा नंदुरबार (४५.८ टक्के), बुलडाणा (४५%), लातूर (४३.२%), नाशिक (४२.२%), बीड (४०.८ %) आणि ठाण्यात (४०.८%) आहे. धुळे (३८.९%), चंद्रपूर (३८.५), नागपूर (३४), बुलडाणा (३१.७%), वाशिम (३१.७%) आणि पुण्यात (३१.४%) सर्वाधिक मुले कुपोषणामुळे दुबळेपणाचे बळी आहेत.
चंद्रपूर (२१.८%), नागपूर (२०), धुळे (१८.१%) आणि वाशिममध्ये (१५.२%) सर्वाधिक मुलांमध्ये दुबळेपणा गंभीर स्थितीत आहे. नंदुरबार (५७.२%), बुलडाणा (४७.२%), चंद्रपूर (४६.६%), धुळे (४६%), नाशिक (४४.८%) आणि औरंगाबादेत (४२.९%) सर्वाधिक मुले सामान्यापेक्षा कमी वजनाची आहेत.मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हे ५ (२०१९-२१) चा आधार घेत सांगितले की, देशात प्रत्येक १०० मधील ३५ पेक्षा जास्त मुले बुटकी आहेत, तर १९ पेक्षा जास्त मुले सामान्यापेक्षा दुबळे आहेत आणि ३२ पेक्षा जास्त मुलांचे वजन सामान्यापेक्षा कमी आहे.
राज्यात ३६ टक्के मुलांचे वजन कमी...सर्वाधिक बुटकी मुले मेघालयात ४६.५, बिहारमध्ये ४२.९, उत्तर प्रदेशमध्ये ३९.७, गुजरातमध्ये ३९ टक्के आहेत. सर्वाधिक २५.६ टक्के मुलांमध्ये दुबळेपणा महाराष्ट्रात आणि २५.१ टक्के गुजरातमध्ये आहे. गुजरातमध्ये सर्वाधिक ३९.७ टक्के, झारखंडमध्ये ३९.४ आणि महाराष्ट्रात ३६.१ टक्के मुलांचे वजन सामान्यापेक्षा कमी आहे.