नवी दिल्ली: अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीवरुन सुरू असलेल्या वादावर मी भाष्य करणार नाही. मी माझं काम करतेय, अशा शब्दांमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य केलं. अर्थव्यवस्थेची चिंता सर्वांनाच असल्याचं म्हणत त्यांनी महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी वस्तू आणि सेवा कर वाढणार असल्याच्या चर्चांवरही स्पष्टीकरण दिलं. माझं कार्यालय सोडून सगळीकडे याबद्दलची चर्चा सुरू असल्याचं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे जीएसटीमध्ये वाढ करण्याचा विचार नसल्याचे संकेत दिले. 18 डिसेंबरला जीएसटी समितीची बैठक होणार आहे. देशाचं महसुली उत्पन्न घटल्यानं या बैठकीत जीएसटी वाढवण्याचा निर्णय होऊ शकतो, अशी चर्चा अर्थ वर्तुळात होती. मात्र सरकारचा तसा कोणताही विचार नसल्याचं सीतारामन यांनी स्पष्ट केलं. यासोबतच अर्थमंत्र्यांनी कांद्यांच्या दरांवरदेखील भाष्य केलं. सरकारकडून कांद्याची आयात सुरू आहे. त्यामुळे देशातील अनेक शहरांमध्ये कांद्याचे दर खाली येऊ लागले आहेत, असं सीतारामन म्हणाल्या.
अर्थव्यवस्थेची चिंता सर्वांनाच; मी माझं काम करतेय- निर्मला सीतारामन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 5:42 PM