भोपाळ - सध्या सोशल मीडियावर एका महिलेची साडी चर्चेचा विषय ठरली आहे. जेव्हा ही महिला ती साडी नेसून घराबाहेर पडते तेव्हा ती सर्वांचच लक्ष वेधून घेते आणि चर्चेचा विषय ठरते. वंशिका चौधरी असे या महिलेचे नाव असून चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1 हजार रुपयांच्या जुन्या नोटांपासून तिने प्रिंटेड साडी बनवली आहे. दैनिक भास्करने हे वृत्त दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला तेव्हा काळा पैसा बाळगणारे पुरते कोंडीत सापडले होते. या नोटांचे करायचे काय? या नोटा कशा कायदेशीर दाखवायच्या? असे प्रश्न अनेकांना पडले होते. काहींनी 500, एक हजाराच्या जुन्या नोटा जाळून टाकल्या तर काहींनी नदी-नाल्यांमध्ये पैसे फेकून दिले. नोटाबंदीच्या या निर्णयाने नागदा येथे राहणाऱ्या वंशिका चौधरीलाही भरपूर दु:ख झाले होते.
आपल्याजवळ असलेल्या जुन्या नोटांचे करायचे काय? असा प्रश्न तिला पडला होता. वंशिकाने या नोटा तिच्या साडीवर प्रिंट करुन घेतल्या. 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटांचे फोटो मोबाइलमधून डिलीट होऊ शकतात पण पाकिटात असणाऱ्या नोटांचे काय करणार. या नोटांची आठवण जपण्यासाठी तिला काहीतरी वेगळे कारयचे होते. त्यासाठी वंशिकाने त्या नोटा स्वत:च्या साडीवर प्रिंट करुन घेतल्या.
जेव्हा कधी मला जुन्या नोटांची आठवण येईल तेव्हा मी ही साडी परिधान करत जाईन असे वंशिकाने सांगितले. वंशिका जेव्हा केव्हा या नोटांची साडी घालून बाहेर पडते तेव्हा प्रत्येकजण तिला पाहत बसतो. वंशिकाचे स्वत:चे एक बुटिक असून ही साडी नेसायला सुरुवात केल्यापासून तिला प्रसिद्धी मिळू लागली आहे.