नवी दिल्ली - देशभरात 1 सप्टेंबरपासून लागू झालेल्या नवीन मोटार वाहन कायद्यानुसार वाहतूक नियम मोडणाऱ्याला मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. वाहतूक नियम मोडल्यास असणारी दंडाची रक्कम 10 पटीने वाढविण्यात आल्याने काही प्रमाणात लोकांमध्ये नाराजीचा सूर आहे. अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून याचा विरोध करताना पाहायला मिळत आहे.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, आपल्याला कायद्याचा सन्मान करायला हवा तसेच कायद्याचा धाक लोकांमध्ये असायला हवा. जर वाहतूक नियमांचे उल्लंघन कराल आणि अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवालही गडकरींनी विचारला आहे.
अशाप्रकारे दंडाची रक्कम वाढविण्याची सरकारची इच्छा नव्हती. मात्र एक वेळ अशी यायला हवी की लोकांना दंड भरण्याची वेळ येऊ नये आणि वाहतूक नियमांचे पालन केले जाईल असं नितीन गडकरींनी सांगितले. नवीन मोटार वाहन कायदा आल्याने वाहनचालकांमध्ये प्रचंड नाराजीची भावना आहे. दिल्लीत या निर्णयाविरोधात येत्या 9 सप्टेंबरला ट्रान्सपोर्ट यूनियन, टॅक्सी यूनियन चक्का जाम आंदोलन करणार आहेत.
अवाजवी दहापट दंड आकारणे चुकीचे असून नवीन कायदा महाराष्ट्रात लागू करू नये. जास्तीत जास्त ५०० रुपयांपर्यंत दंड आकारावा, अशी मागणी अ.भा. ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटनमंत्री गजानन पांडे यांनी केली आहे. कुठलाही कायदा करताना सर्वसामान्य ग्राहकांना विश्वासात घेतलेले नाही. नवीन कायद्यात दहापट दंडाची तरतूद केली आहे. ही शिक्षा लोकशाहीत अव्यावहारिक असून हा जिझिया कर आकारण्यासारखे आहे. नागरिकांना शिस्त लावण्यासाठी प्रबोधन आवश्यक आहे. दहापट दंड श्रीमंत लोक भरू शकतील, पण गरीब आणि सामान्य भरू शकणार नाही. त्यांनी आपली वाहने विकून दंड भरायचा का, असा सवाल ग्राहक पंचायतने उपस्थित केला आहे.
तसेच गुरुग्राम वाहतूक पोलिसांनी मंगळवारी रात्री राम गोपाल नामक एका ट्रॅक्टर-ट्रॉली चालकाला अडवलं. न्यू कॉलनी परिसरात त्यानं एक सिग्नल तोडला होता आणि एका मोटारसायकलला धडक दिली होती. पोलिसांनी कागदपत्रं मागितली, तेव्हा त्याच्याकडे लायसन्स, आरसी, फिटनेस सर्टिफिकेट, इन्शूरन्स यापैकी काहीच नव्हतं. त्यासोबतच, ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन त्यानं केलं होतं. वेगमर्यादा पाळली नव्हती आणि ट्रॅक्टर-ट्रॉलीत क्षमतेपेक्षा जास्त सामान भरलं होतं. या सगळ्या चुकांची शिक्षा म्हणून पोलिसांनी तब्बल ५९ हजार रुपये दंडाची पावती त्याच्या हातावर ठेवली हेदेखील सोशल मीडियात व्हायरल झालं होतं.