नवी दिल्ली : वडील आपला मुलगा किंवा मुलीवर स्वत:ची मते लादू शकत नाही. प्रत्येक अपत्याला आपल्या आईचे आडनाव लावण्याचा अधिकार आहे असा महत्वपूर्ण निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे.अल्पवयीन मुलीच्या नावापुढे तिच्या आईचे नव्हे तर आपले आडनाव लावावे व सर्व कागदपत्रांतही तसाच उल्लेख व्हावा, असा आदेश देण्याची विनंती मुलीच्या वडिलांनी याचिकेद्वारे दिल्ली न्यायालयाला केली होती. त्यावर न्या. रेखा पल्ली यांनी असा आदेश देण्यास नकार दिला.कोर्टाने म्हटले आहे की, स्वत:च्या अल्पवयीन मुलीने फक्त आपलेच आडनाव लावावे असा आग्रह तिचे वडील धरू शकत नाहीत. जर आईचे आडनाव लावणे मुलीला मंजूर असेल तर मग त्याला तिचे वडील इतका विरोध का करत आहेत, असा सवालही न्यायालयाने विचारला. प्रत्येक मुलगा किंवा मुलीची इच्छा असेल तर त्यांना स्वत:च्या नावापुढे आपल्या आईचे आडनाव लावण्याचा हक्क आहे व तो कोणालाही हिरावून घेता येणार नाही. सुनावणीवेळी मुलीच्या वडीलांनी सांगितले की, माझी मुलगी अल्पवयीन आहे. ती आडनावाबाबतचे निर्णय घेण्यास अजून सक्षम नाही. विभक्त पत्नीने मुलीचे आडनाव बदलल्याने इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे काढताना अडचणी येऊ शकतात.
शाळेला विनंती करण्याची मुभान्यायालयाने याचिका निकाली काढताना मुलीच्या वडिलांना एका गोष्टीची मुभा दिली. मुलीचे आपण वडील आहोत अशी नोंद शालेय कागदपत्रांत होण्यासाठी ते शाळेला विनंती करू शकतात, असे न्यायालयाने म्हटले आहे.