मुंबई - प्रत्येकाला निषेध करण्याचा हक्क आहे, मात्र हिंसा हा मार्ग नाही असं मत मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने व्यक्त केलं आहे. पद्मावती चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादावर आमीर खानने अखेर मौन सोडलं असून, दीपिका पदुकोन आणि संजय लिला भन्साळी यांना मिळणा-या धमक्या ही अत्यंत दुर्देवी गोष्ट असल्याचं आमीर म्हणाला आहे. यावेळी आमीर खानने पद्मावती चित्रपटावरुन निर्माण झालेल्या वादावर थेट प्रतिक्रिया देणं टाळलं. पण हिंसा हा एखाद्या समस्येवरील उपाय असू शकत नाही असं त्याने सांगितलं.
'मला वाटतं प्रत्येकाला निषेध करण्याचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये आणि आपल्या देशात जिथे कायद्याचे नियम पाळले जातात तिथे कुणीही हिंसेचा मार्ग अवलंबत धमक्या देऊ नये असं माझं मत आहे. हे अत्यंत दुर्देवी आहे', असं आमीर खान म्हणाला आहे. आमीर खानने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत आपलं मत मांडलं.
'तुम्ही आयुष्यात काहीही करत असा...तुम्ही चित्रपटाशी संबंधित असा किंवा नसो...तुम्ही डॉक्टर असाल, इंजिनिअर असाल किंवा सरकारी कर्मचारी असाल...एखाद्याला जीवे मारण्याची धमकी देणं दुर्दैवी आहे', असं आमीरने सांगितलं.
आमीर खानने या धमक्या फक्त अभिनेत्यांपुरत्या मर्यादित नसल्याचंही म्हटलं आहे. 'एक भारतीय म्हणून या गोष्टी हे मला दु:खी करतं. हे फक्त चित्रपटसृष्टीपुरतं मर्यादित नसून, येथे कोणीही असू शकतं. कायदा हातात घेण्याची परवानगी कोणालाही नाही आणि कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही', असं आमीर म्हणाला आहे.
चित्रपटगृहांत झळकण्यापूर्वीच वादाचा विषय ठरलेल्या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या ऐतिहासिक कथानकावरील चित्रपटाची १ डिसेंबर ही प्रदर्शनाची नियोजित तारीख ‘व्हायकॉम १८ मोशन पिक्चर्स’ या निर्मात्या व वितरण कंपनीने पुढे ढकलली आहे.
राणी पद्मिनी अर्थात पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पदुकोन, शाहिद कपूर राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीच्या भूमिकेत आहे. अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे. पद्मावती चित्रपटात रणवीर सिंग अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेत आहे. रणवीर सिंग पहिल्यांदाच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. गोलियोंकी रासलीला-रामलीला, बाजीराव मस्तानी या चित्रपटांनंतर दीपिका-रणवीर ही जोडी तिसऱ्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे.