कन्नड भाषेबद्दल नसलेले पोषक वातावरण याचा दाखला देत कर्नाटकचेमुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी खेद व्यक्त केला. यावेळी त्यांनी कर्नाटक राज्याचा इतिहासाचा पाढाच वाचला. ते म्हणाले की, आपल्या राज्याला 'कर्नाटक' हे नाव मिळून ५० वर्ष उलटली आहेत. कन्नड भाषिक खूप उदारमतवादी असून ही कमतरता कन्नड भाषा, तिची संस्कृती आणि परंपरा यांच्या विकासात अडथळा आणत आहे. यावेळी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी 'कर्नाटक गोल्डन कॉन्फ्लुएंस'च्या लोगोचे प्रकाशन केले.
तसेच आपण आपली भाषा इतरांना शिकवत नाही तर त्यांची भाषा शिकतो. आपण आपली भाषा इतरांना शिकवली पाहिजे. आपण उर्दू भाषिकांशी उर्दूमध्ये बोलतो, हिंदी भाषिकांशी हिंदीत बोलतो आणि तमिळ लोकांशी तामिळमध्ये बोलतो. त्यामुळे मला वाटते की, राज्याची भाषा, संस्कृती आणि परंपरा यांच्या विकासासाठी हा चांगला बदल नाही. म्हणून मी म्हणेन की, येथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने कन्नड बोलायला शिकले पाहिजे. कन्नडसाठी वातावरण आणि गरज निर्माण करण्याची जबाबदारीही आमची आहे, पण आम्ही तसा प्रयत्न केला नाही, असेही सिद्धारामय्या यांनी नमूद केले.
कन्नड माहीत नसतानाही इथे सहज रमलो - सिद्धारामय्या"मला कन्नड कळत नव्हते असे असताना देखील मी इथे सहज रमलो. तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ किंवा उत्तर प्रदेशात फक्त कन्नडमध्ये बोलून आपण टिकू शकतो का? मात्र, कर्नाटकात कन्नड न समजता देखील राहता येते. शेजारच्या राज्यांमध्ये आणि आपल्यामध्ये हाच फरक आहे. आम्ही कन्नड भाषिक खूप उदारमतवादी आहोत. आम्ही लोकांना इतर भाषा शिकण्यास किंवा बोलण्यास मनाई करणार नाही. पण, कर्नाटकात कन्नड भाषिकांसाठी वातावरण निर्माण करण्याची गरज आहे आणि हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे", असेही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले.