नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दिल्लीतील हिंसाचार रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत हिंसाचार रोखण्यासाठी सर्वपक्षीय मिळून प्रयत्न करू, असे सांगितले. अमित शाह आणि अरविंद केजरीवाल यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये द्वेष पसरवणारे संदेश, पोलीस आणि आमदारांमधील समन्वय, सुरक्षा बलांची तैनाती आणि अफवांना रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर मुख्यत्वेकरून चर्चा झाली. अमित शाह यांच्यासोबतची बैठक आटोपल्यावर केजरीवला म्हणाले की, ''दिल्लीत उसळलेला हिंसाचार थांबावा असेच सर्वांना वाटते. केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यासंदर्भात आज बोलावलेली बैठकही सकारात्मक झाली आहे. हा दिल्लीचा प्रश्न आहे आणि सर्वपक्षीय मिळून त्यासाठी प्रयत्न करू.'' दरम्यान, ''दिल्लीत शांतता प्रस्तापित करण्यासाठी गजर पडल्यास लष्कराला तैनात केले जाईल. मात्र सध्यातरी पोलिसांकडून योग्य ती कारवाई केली जात आहे. तसेच शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुरेसे पोलीस दल तैनात केले जाईल, असे आश्वासन अमित शाह यांनी दिले आहे, असेही केजरीवाल यांनी सांगितले.
Delhi Violence : दिल्लीतील हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी सर्वपक्षीय मिळून प्रयत्न करू - अरविंद केजरीवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 1:40 PM