ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ - वन रँक वन पेन्शनच्या मुद्द्यावरुन जवानांची दिशाभूल केली जात असून या योजनेचा लाभ सैन्यातील प्रत्येक स्तरावरील जवानाला मिळेल अशी महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. गेल्या ४२ वर्षांपासून या मुद्द्यावर तोडगा काढू न शकणा-यांनी आम्हाला प्रश्न विचारु नये असे सांगत मोदींनी विरोधकांनाही सुनावले आहे.
दिल्लीजवळील फरिदाबाद - बदरपूर मार्गावरील मेट्रो सेवेचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेतली. यात त्यांनी वन रँक वन पेन्शनच्या प्रलंबित प्रश्नावर भूमिका स्पष्ट केली. 'गेल्या ४२ वर्षांपासून वन रँक वन पेन्शनच्या वादावर तोडगा निघाला नव्हता, मात्र आम्ही तुम्हाला आश्वासन दिलेले व ते आम्ही पूर्ण केले आहे' असे मोदींनी स्पष्ट केले. सरकारला जवानांपेक्षा महत्त्वाचे काहीही नसून या जवानांना योग्य सन्मान मिळणे आवश्यक आहे. वन रँक वन पेन्शन लागू झाल्यास जवानांना सन्मान मिळेल व देशभक्तीलाही प्रोत्साहन मिळेल असे मोदींनी सांगितले. १५ ते १७ वर्षानंतर नाईलाजाने स्वेच्छा निवृत्ती स्वीकारणा-या नाईक, शिपाई, हवालदार अशा प्रत्येक स्तरावरील जवानाला या योजनेचा लाभ मिळेल असेही मोदींनी नमूद केले. आमचे सरकार विकासासाठी कटीबद्ध आहे असा पुनरुच्चारही त्यांनी केला.
दरम्यान, या उद्घाटन सोहळ्याला जाण्यासाठी मोदींनी रविवारी थेट मेट्रोने प्रवास केला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींना मेट्रोत बघून त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली होती.
निवृत्त जवानांचे उपोषण मागे
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वन रँक वन पेन्शन संदर्भात स्पष्टीकरण दिल्यावर दिल्लीतील जंतर मंतर येथे उपोषणाला बसलेल्या जवानांनी उपोषण मागे घेतले. आम्ही उपोेषण मागे घेतले असले तरी आमचा लढा मात्र सुरुच राहील अशी प्रतिक्रियाही या जवानांनी दिली.