केरळमधील तिरुवनंतपुरम येथे एका मेडिकलच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्यानंतर दोन दिवसांनी पोलिसांनी एका डॉक्टरला ताब्यात घेतले आहे. या डॉक्टरवर हुंड्याची मागणी पूर्ण न केल्याने लग्नास नकार दिल्याचा आरोप आहे. सरकारी मेडिकल कॉलेजमधील सर्जरी विभागातील पीजी स्टुडंट शहाना (२६) ही तिच्या फ्लॅटमध्ये बेशुद्धावस्थेत सापडली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
प्रसारमाध्यमांतील रिपोर्टनुसार या महिला डॉक्टरने जीवन संपवण्यासाठी अॅनेस्थेटिकची अधिक मात्रा असलेले इंजेक्शन टोचून घेतले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अपार्टमेंटमध्ये एक कथित चिठ्ठी सापडली आहे. त्यावर लिहिले होते की, सर्वांना केवळ पैसे हवे आहेत. दरम्यान, मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबाच्या निकटवर्तीयांनी आरोप केला की, डॉक्टर असलेल्या तिच्या मित्राने हुंड्याचं कारण देत लग्नाला नकार दिल्याने गेल्या काही काळापासून शहाना ही निराश होती.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, नातेवाईकांच्या जबाबांच्या आधारावर या महिला डॉक्टर विद्यार्थिनीचा मित्र रुवेस याला गुरुवारी सकाळी करुनागपल्ली येथून ताब्यात घेण्यात आलं आहे. रुवेस हासुद्धा कॉलेजमध्ये डॉक्टर आहे. मेडिकलची विद्यार्थिनी असलेल्या या डॉक्टर तरुणीच्या मृत्यूनंतर अनैसर्गिक मृत्यूची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. पोलिसांनी पुढे सांगितले की, डॉ. शहाना हिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या जबाबांच्या आधारावर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आणि हुंडा प्रतिबंधक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काळ बदलला तरी भारतीय समाजातील हुंडा पद्धती अद्याप अस्तित्वात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार सोमवार ४ डिसेंबर रोजी एनसीआरबीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार २०२२ मध्ये हुंडा प्रतिबंधक अधिनियम १९६१ अंतर्गत १३ हजार ४७९ प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. तर २०२२ मध्ये ६ हजार ४५० हुंडाबळींची नोंद झाली आहे.