भजनलाल शर्मा हे राजस्थानचे नवीन मुख्यमंत्री असणार आहेत. भजनलाल शर्मा हे पहिल्यांदा सांगानेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. शर्मा मूळचे भरतपूरमधील नदईचे आहे. जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या कुटुंबात आनंद आणि उत्सवाचे वातावरण होते. भजनलाल शर्मा यांचे वडील किसन स्वरूप शर्मा म्हणाले, "मुलगा मुख्यमंत्री झाला आहे. खूप आनंद झाला आहे. ही सर्व देवाची कृपा आहे. कुटुंबीयांना अशी कोणतीही आशा नव्हती. परंतु जेव्हा देवाची इच्छा असते तेव्हा काहीही घडू शकतं."
भजनलाल शर्मा यांची आई गोमती देवी यांनी देखील य़ावर प्रतिक्रिया दिली आहे. "मुलगा मुख्यमंत्री झाला आहे. खूप चांगलं वाटतंय. मुख्यमंत्री होऊन लोकांसाठी चांगलं काम करेल. विकासाची कामं करेल. तो खूप मेहनती आहे. जनतेसाठी खूप काम करेल. तो बर्याच काळापासून राजकारणात होता. त्याने खूप परिश्रम घेतले आहेत" असं आईने म्हटलं आहे. NDTV ने भजनलाल शर्मा यांच्या आई-वडिलांशी संवाद साधला असता त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
राजस्थानचे नवे मुख्यमंत्री आहेत कोट्यवधींचे मालक! संपत्ती आणि कर्ज किती? जाणून घ्या...
भजनलाल शर्मा हे करोडपती आहेत आणि त्याची एकूण संपत्ती 1.40 कोटी रुपये आहे, तर 35 लाखांचं कर्ज आहे. विधानसभा निवडणुकीत दिलेल्या संपत्तीच्या तपशिलाशी संबंधित प्रतिज्ञापत्रानुसार, राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या एकूण संपत्तीपैकी 1,15,000 रुपये रोख आहेत, तर विविध बँकांमधील खात्यामध्ये जवळपास 11 लाख रुपये आहेत.
शर्मा यांच्याकडे तीन तोळं सोनं आहे, ज्याची किंमत 1,80,000 रुपये आहे. त्यांनी शेअर्स किंवा बाँड्समध्ये कोणतीही गुंतवणूक केलेली नाही, परंतु त्यांच्याकडे LIC आणि HDFC Life च्या दोन विमा पॉलिसी आहेत, ज्यांची किंमत 2,83,817 रुपये आहे. याशिवाय वाहनांबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या नावावर टाटा सफारी आहे, ज्याची किंमत पाच लाख रुपये प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आली आहे, याशिवाय एक टीव्हीएस व्हिक्टर मोटारसायकल असून ज्याची किंमत 35,000 रुपये आहे.