देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या केंद्रीय तपास संस्थेच्या - अर्थात सीबीआयच्या क्रमांक एक आणि क्रमांक दोनच्या अधिकाऱ्यांमधील वाद विकोपाला गेला आहे. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यातील फूट चव्हाट्यावर आली आहे. मांस निर्यातदार मोईन कुरेशीकडून ३ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप अस्थाना यांच्यावर झाल्यानंतर सीबीआयनंच त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. त्याची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. आलोक वर्मा मोदींना भेटल्यानंतर तासाभरात सीबीआयच्या एसआयटीचे उपअधीक्षक देवेंद्रकुमार यांना अटक करण्यात आली. त्यानंतर सीबीआयने अनेक अधिकाऱ्यांच्या घरी-ऑफिसांवर धाडी टाकल्यात. देशातील सर्वात मोठ्या तपास संस्थेत पहिल्यांदाच दोन अधिकाऱ्यांमध्ये एवढी मोठी लढाई पाहायला मिळतेय. त्यामागे काय कारण आहे, कधी पडली या वादाची ठिणगी आणि कसं घडलं महाभारत, याचा सविस्तर आढावा....
>> ऑक्टोबर २०१७. केंद्रीय दक्षता आयुक्तांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय पॅनलची बैठक. राकेश अस्थाना यांना सीबीआयचे विशेष संचालक म्हणून पदोन्नती देण्यास आलोक वर्मा यांनी विरोध केला आणि इथेच सीबीआयमध्ये शीतयुद्ध सुरू झालं.
>> सीबीआय अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करताना अस्थाना यांनी आपल्या शिफारशी धुडकावल्याचं वर्मांना जाणवलं आणि तणाव वाढला.
>> अस्थाना यांच्यावर स्टर्लिंग बायोटेक घोटाळ्याचा आरोप असल्यानं विनाकारण सीबीआय संशयाच्या फेऱ्यात येईल, असं आलोक वर्मा यांचं मत होतं. परंतु, त्यांचा हा मुद्दा पॅनलनं फेटाळला आणि अस्थाना यांना बढती दिली. नंतर, सर्वोच्च न्यायालयाने अस्थाना यांना क्लीन चिट दिली.
>> १२ जुलै २०१८. आलोक वर्मा विदेशात होते. त्यावेळी केंद्रीय दक्षता आयोगानं सीबीआयमधील प्रमोशनबाबत चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. वर्मा नसल्याने, नंबर-२ चे अधिकारी या नात्यानं त्यांनी राकेश अस्थाना यांना बोलावलं. ही बाबही वर्मांना खटकली. माझ्या अनुपस्थितीत बैठकीला जाण्याचे अधिकार आपण अस्थाना यांना दिलेले नव्हते, असं पत्र त्यांनी आयोगाला पाठवलं.
>> २४ ऑगस्ट २०१८. राकेश अस्थाना यांनी केंद्रीय दक्षता आयोग आणि कॅबिनेट सचिवांना पत्र पाठवलं. त्यात आलोक वर्मा आणि त्यांचे निकटचे सहकारी अतिरिक्त संचालक ए के शर्मा यांच्याविरोधातील कथित भ्रष्टाचाराची माहिती होती. अनेक आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावाही त्यांनी केला होता. हैदराबादचे उद्योजक सतीश बाबू सना याने आलोक वर्मा यांना २ कोटी रुपये दिल्याचं सांगत त्यांनी खळबळ उडवून दिली.
>> गेल्या आठवड्यात त्यांनी आणखी एक 'लेटर बॉम्ब' टाकला. गेल्या महिन्यात सतीश बाबू सना याला आपण अटक करणार होतो, पण वर्मा यांनी आपला प्रस्ताव धुडकावल्याची तक्रार अस्थाना यांनी केली. याआधीही त्यांची चौकशी करण्यापासून आपल्याला रोखण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं.
>> दुसरीकडे, आलोक वर्मा यांनी अस्थाना यांच्याकडील महत्त्वाची प्रकरणं काढून ए के शर्मा यांच्याकडे सोपवली. अस्थाना यांच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या.
>> त्यानंतर, ४ ऑक्टोबरला सीबीआयनं सतीश बाबू सना याला अटक केली. त्यावेळी त्याने मॅजिस्ट्रेटसमोर अस्थाना यांच्याविरोधात जबाब नोंदवला. दहा महिन्यांमध्ये अस्थाना यांना ३ कोटी रुपयांची लाच दिल्याचा गौप्यस्फोट त्यानं केला.
>> १५ ऑक्टोबरला सीबीआयने अस्थाना यांच्याविरोधात लाच घेतल्याचा गुन्हा नोंदवला. त्यानंतर या प्रकरणाची दखल पंतप्रधान मोदींनीही घेतलीय. हा वाद शमवण्याचं काम ते आपल्या हुकमी एक्क्याकडे - राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडे सोपवण्याची शक्यता आहे.
>> अटक टाळण्यासाठी अस्थाना यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
या 'महानाट्या'तील पात्रपरिचय...
आलोक वर्माः १९७९च्या बॅचचे आयपीएअस अधिकारी. १ फेब्रुवारी २०१७ रोजी ते सीबीआयचे प्रमुख झाले. हे पद स्वीकारण्याआधी ते दिल्ली पोलीस आयुक्त होते.
राकेश अस्थानाः १९८४च्या बॅचचे गुजरात आयपीएस अधिकारी. सीबीआयचे विशेष संचालक. जेएनयूमध्ये शिक्षण घेतलेल्या अस्थाना यांनी चारा घोटाळा आणि गोध्रा हत्याकांडाचा तपास केला होता. स्टर्लिंग बायोटेक घोटाळ्यात त्यांच्यावर लाचखोरीचा आरोप आहे.
ए के शर्माः गुजरात कॅडरचे १९८७च्या बॅचचे आयपीएस अधिकारी. २०१५ पासून सीबीआयमध्ये सहसंचालक या पदावर कार्यरत. वर्षाच्या सुरुवातीला आलोक वर्मा यांनी त्यांना पदोन्नती दिली आणि अतिरिक्त संचालकपद दिलं. अस्थाना यांच्याकडील सर्व प्रकरणं शर्मांकडे सोपवण्यात आली.
देवेंद्र कुमारः सीबीआयचे डीएसपी देवेंद्र कुमार यांना लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मांस निर्यातदार मोइन कुरेशी याच्याविरोधातील खटल्याचे तपास अधिकारी होते. त्यांनी सतीश बाबू सना याचा खोटा जबाब तयार केल्याचा दावा सीबीआयनं केला आहे.
मोइन कुरेशीः उत्तर प्रदेशात रामपूर येथे कत्तलखाना चालवणारा मोइन कुरेशी पुढे देशातला सर्वात मोठा मांस निर्यातदार झाला. सीबीआयचे माजी प्रमुख ए पी सिंह आणि रंजीत सिन्हा यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. तपास संस्था त्यांच्याववरील करचोरी, आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचाराच्या आरोपांचा तपास करत आहे. २०११ मध्ये मुलीच्या लग्नात त्यांनी प्रसिद्ध पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना बोलावलं होतं.
सतीश बाबू सनाः एके काळी आंध्र प्रदेश वीज मंडळात नोकरी करणारे सना हा हैदराबादमधील उद्योजक आहे. २०१५ मध्ये मांस निर्यातदार मोइन कुरेशविरोधात ईडीने दाखल केलेल्या खटल्यात त्याचं नाव पुढे आलं होतं.
मनोज आणि सोमेश प्रसादः मनोज आणि सोमेश प्रसाद हे भाऊ मूळ उत्तर प्रदेशचे. त्यापैकी मनोज दुबईत मध्यस्थी करतो. त्याला सीबीआयनं अटक केली होती. मनोजनेच आपलं नाव खटल्यातून काढण्यासाठी पाच कोटी रुपये मागितले होते, ते अस्थानाला पोहोचवले जाणार होते, असा दावा सतीश बाबू सना याने केला आहे.