Sambhal Shahi Jama Masjid Issue: संभल शाही जामा मशिदीच्या जागेवरून नवा वाद सुरू झाला आहे. या मशिदीच्या जागी पूर्वी मंदिर होते, असा दावा करण्यात आला होता. मशिदीचा सर्वे करण्यात आला. ॲडव्होकेट आयोगाने केलेल्या सर्वे अहवाल बंद लिफाफ्यातून न्यायालयात सादर करण्यात आला असून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शाही जामा मशिदीमध्ये पूर्वी मंदिर असल्याचे पुरावे मिळाल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. आजतकने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
संभलमधील शाही जामा मशिदीमध्ये झालेल्या ॲडव्होकेट आयोगाचा रिपोर्ट न्यायाधीश आदित्य सिंह यांच्या न्यायालयात सादर करण्यात आला. ॲडव्होकेट आयुक्त रमेश राघव यांनी हा रिपोर्ट तयार केला असून, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाही मशिदीमध्ये पूर्वी मंदिर असल्याचे अनेक पुरावे मिळाले असल्याचे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
शाही जामा मशिदीमध्ये कोणते पुरावे आढळून आले?
मशिदीच्या आतमध्ये दोन वडाची झाडे आहेत. हिंदू धर्माच्या मंदिरामध्येच वडाच्या झाडांची पूजा होते. इतकेच नाही, तर मशिदीमध्ये बारवही (जुनी विहीर) आढळला असून, अर्धा बाहेर, तर अर्धा झाकलेला आहे, असे या रिपोर्टमध्ये म्हटलेले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शाही जामा मशिदीमध्ये १९ डिसेंबर २०२४ रोजी पहिले सर्वे झाला होता. जवळपास दीड तास व्हिडीओ शूट करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जवळपास तीन तास व्हिडीओ शूट करण्यात आले होते. १२०० फोटोही मशिदीतील ठिकाणांचे घेण्यात आले होते.
मशिदीचे निरीक्षण केल्यानंतर आतमध्ये ५० पेक्षा अधिक फुलांचे निशाण आणि इतर कलाकृती आढळून आल्या. जुना ढाचा बदलण्यात आल्याचेही पुरावे मिळाले आहेत. त्याचबरोबर मंदिराच्या आकाराच्या बांधकामावर प्लास्टर करुन बदलण्यात आल्याचेही पुरावे मिळाले आहेत.
शाही जामा मशिदीमध्ये अशी प्रतिके आढळून आली आहेत, जी त्याकाळी मंदिरांमध्ये बनवली जात होती. मंदिराचे दरवाजे, अलंकृत भिंती यावर प्लास्टर करून रंग लावण्यात आलेला असून, त्यामुळे जुन्या खाणाखुणा झाकल्याचे पुरावे मिळाले असल्याचे सूत्रांनी सांगितले.