नवी दिल्ली - मतदानासाठी वापरण्यात येत असलेल्या इव्हीएमच्या विश्वसनियतेवर वर विविध राजकीय पक्ष आणि तज्ज्ञांकडून वारंवार शंका उपस्थित करण्यात येत आहेत. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनेही वेळोवेळी इव्हीएमविरोधी सूर आळवला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाकडूनही इव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यासाठी सहमती दर्शवण्यात येत आहे. जर सर्वपक्षांचे एकमत झाले तर भविष्यात इव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरने मतदान घेण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे मत भाजपाकडून मांडण्यात आले आहे. दिल्लीत सुरू असलेल्या काँग्रेसच्या 84 व्या महाअधिवेशनात मतपत्रिकेद्वार मतदान घेण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर भाजपाचे महासचिव राम माधव यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ही माहिती दिली. माधव म्हणाले, मतपत्रिकेऐवजी इव्हीएमने मतदान घेण्याचा निर्णय व्यापक स्तरावर सहमती झाल्यावर घेण्यात आला होता. आता आज जर प्रत्येक पक्षाने पुन्हा एकदा मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यास सहमती देण्याबाबत विचार सुरू केला तर आम्हीसुद्धा याबाबत विचार करू शकतो.
EVM ला बाय बाय, पुढच्या निवडणुका मतपत्रिकेद्वारे? राम माधव यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2018 1:52 PM