कोलकाता - निवडणुकांमध्ये पारदर्शकता असावी तसंच या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड होऊ नये, यासाठी पुन्हा मतपत्रिका प्रणाली लागू व्हावी, अशी मागणी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी शनिवारी केली. शिवाय, त्यांनी ईव्हीएमचा चोर मशिन असादेखील उल्लेख केला. भाजपाला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांचे शक्तिप्रदर्शन करण्याच्या हेतूने तृणमूल काँग्रेसने आज कोलकाता येथील बिग्रेड मैदानावर महामेळाव्याचे आयोजन केले आहे.
या मेळाव्याला संबोधित करताना फारूक अब्दुल्ला यांनी भाजपावर चौफेर टीका केली. ते म्हणाले की, ''एका व्यक्तीला (पंतप्रधान नरेंद्र मोदी )सत्तेतून हटवणे हा प्रमुख मुद्दा नाहीय. देशाचे रक्षण करणे आणि देशासाठी बलिदान देणाऱ्यांचा सन्मान करण्याचा मुख्य उद्देश आहे.
पुढे त्यांनी असंही म्हटले की, ईव्हीएम, चोर मशिन आहे. या मशिनच्या वापरावर बंदी आणली पाहिजे. ईव्हीएमचा वापर थांबवण्यासाठी आणि पारदर्शकतेसाठी निवडणुकांदरम्यान मतपत्रिका प्रणाली पुन्हा सुरू करण्यासाठी विरोधकांनी निवडणूक आयोग आणि राष्ट्रपतींची भेट घ्यायला हवी.
जम्मू काश्मीरमधील परिस्थितीसाठीही त्यांनी भाजपाला जबाबदार ठरवले आहे. ते म्हणाले की, 'मी मुस्लीम आहे, पण मी देखील भारताचा एक भाग आहे. जम्मू- काश्मीरमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला भारतासोबत राहायचे आहे'.