EVM Hacking : भाजपच्या नेत्याकडे ब्लॅकमेलसाठी गेली टीम; 11 जणांची हत्या केली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 10:54 AM2019-01-23T10:54:54+5:302019-01-23T10:55:47+5:30
ईव्हीएम हॅकिंगच्या प्रकरणाने भारतात राजकीय वर्तुळात खळबळ माजविली असतानाच परदेशी हॅकर सैयद शुजाने आणखी काही धक्कादायक दावे केले आहेत.
नवी दिल्ली : ईव्हीएम हॅकिंगच्या प्रकरणाने भारतात राजकीय वर्तुळात खळबळ माजविली असतानाच परदेशी हॅकर सैयद शुजाने आणखी काही धक्कादायक दावे केले आहेत. हैदराबाद येथील भाजप नेत्याला भेटायाला गेलेल्या आपल्या टीमच्या 11 जणांची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्याने केला आहे. ही टीम भाजपला ब्लॅकमेल करण्यासाठी गेली होती, असेही त्याने म्हटले आहे.
शुजाने सांगितले की एक भारतीय पत्रकार त्याला भेटायला अमेरिकेत आला होता. त्या पत्रकाराने शुजाला सांगितलेले की या प्रकरणाला वाचा फोडली जाईल. परंतू त्याने तसे केले नाही. 'हाऊ डेयर यू' असे म्हणत हा पत्रकार रोज टीव्हीवर येत असतो. एवढेच नाही तर, पत्रकार गौरी लंकेश यांचीही हत्या ईव्हीएम हॅकिंगशी जोडली आहे. लंकेश या ही बातमी उघड करणार होत्या. मात्र, त्याआधीच त्यांना मारण्यात आले.
शुजाने दावा केला आहे, त्याची टीम 2014 मध्ये हैदराबादच्या एका भाजप नेत्याला भेटली होती. त्यांनी या नेत्याला ब्लॅकमेल केले. ते केवळ मजेसाठी केले होते. मात्र, त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. यामध्ये आपले 11 सहकारी मारले गेले. मी जखमी झालो होते. ही घटना हैदराबादच्या उपनगरातील आहे. पुढील दिवशीच किशनबाग दंग्यामध्ये तीन जण मारले गेले होते. यामुळे मलाही मारण्यात येईल या भीतीने अमेरिका गाठल्याचे, शुजाने म्हटले आहे.