नवी दिल्ली - बिहारमध्ये भाजपा-काँग्रेससह सर्वच स्थानिक राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी किशनगंजमध्ये जाहीर सभा घेतली. राहुल यांनी यावेळी केंद्रातील मोदी सरकार आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांनी एकत्र बिहारची लूट सुरू केली आहे. बिहारमधील शेतकरी, कामगार, छोट्या दुकानदारांना संपवलं आहे. यामुळे बिहारच्या तरुणांनी आणि शेतकऱ्यांनी आता महाआघाडीला विजयी करून बिहारमध्ये सत्ता बदलाचं काम करावं आहे" असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं. त्यानंतर, आज पुन्हा एकदा राहुल गांधींनी मोदी सरकावर टीका केली आहे.
ईव्हीएम मशिनमध्ये घोळ असल्याची टीका सातत्याने राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांकडून होत होती. आताही राहुल गांधींनी ईव्हीएम मशिनवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ईव्हीएम मशिन ही एमव्हीएम असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं. राहुल गांधींनी पुन्हा एकदा ईव्हीएम मशिनवरुन मोदी सरकारवर टीका केली आहे. ईव्हीएम मशिनचे नाव ईव्हीएम नसून एमव्हीएम आहे, MVM म्हणजे मोदी व्होटींग मशिन, असे राहुल गांधींनी म्हटले आहे. बिहारमधील तरुणाईमध्ये प्रचंड राग आहे, त्यामुळे ईव्हीएम असो किंवा एमव्हीएम असो, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीचाच विजय होईल, असेही राहुल यांनी म्हटले आहे. बिहारमधील अरारिया येथील जनसभेला संबोधित करताना राहुल गांधींनी मोदी सरकावर टीका केली.
छत्तीसगडप्रमाणे बिहारच्या शेतकऱ्यांनाही पैसे मिळावेत
"छत्तीसगडमधील सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करते आणि बिहार सरकार शेतकर्यांचे पैसे लाटते. पंतप्रधान मोदींनी एक नवीन कृषी कायदे केले. हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. हे कायदे मोदींनी त्यांच्या काही मित्रांसाठी केले आहेत. अंबानी आणि अदानी यांच्याशी शेतकरी व्यवहार करू शकतील का? एक गुजरातमध्ये, एक मुंबईत आणि तुम्ही बिहारमध्ये. छत्तीसगडप्रमाणे बिहारमधील शेतकऱ्यांनाही थेट खात्यात 2500 रुपये मिळावेत, असा आमचा विचार आहे" असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
"भाजपा-आरएसएसचे काम हे द्वेष पसरवणं आणि फूट पाडण्याचं"
राहुल गांधी यांनी "पंतप्रधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शेतकरी आणि गरिबांवर सर्वाधिक हल्ला केला आहे. भाजपा-आरएसएसचे काम हे द्वेष पसरवणं आणि फूट पाडण्याचं आहे. भाजपाचा बी-टीम सतत द्वेष पसरवत आहे. यामुळे आम्ही भाजपाच्या ए आणि बी या दोन्ही टीमशी लढत आहोत" असं म्हटलं आहे. नितीश कुमार यांनी तरुणांना नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण तरुणांनी त्यांना नोकरीबद्दल विचारल्यावर ते शिवीगाळ करतात. रोजगार उपलब्ध करण्यात अपयशी ठरलो असं नितीश कुमार यांनी म्हटलं पाहिजे. देशात ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे तिथे शेतकरी, गरीब आणि रोजगार निर्मितीसाठी काम केलं जातं असंही ते म्हणाले.