अहमदाबाद- गुजरातच्या भरूचमध्ये सुमारे 100 इव्हीएम मशीन्स आणि व्हीव्हीपॅट घेऊन जाणारा ट्रक पलटल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पाटीदार संघटनेचा नेता हार्दिक पटेल याने ट्विटरवरून अप्रत्यक्षपणे भाजपावर टीका केली आहे. गुजरातमध्ये ट्रक पलटी होणाच्या घटनेवर हार्दिकने संशय व्यक्त केला आहे.
'इव्हीएम मशीनने भरलेला ट्रक भरूचजवळ पलटला. ट्रक चालकाला काहीही झालं नाही पण इव्हीएक मशीन तुटल्या', असं ट्विट हार्दिक पटेलने केलं. रस्त्याच्या बाजूला पलटलेल्या ट्रकचा फोटो ट्विट करत हार्दिकने हे वक्यव्य केलं आहे.
फेरमतमोजणीची मागणी सुरू होताच इव्हीएम मशीनने भरलेला ट्रक पलटी झाला, या घटनेला काय नाव देणार? असा सवाल हार्दिकने दुसरं ट्विट करत उपस्थित केला आहे.
गुरूवारी गुजरातच्या भरूच येथे सुमारे १०० इव्हीएम मशीन्स आणि व्हीव्हीपॅट घेऊन जाणारा ट्रक पलटल्याची घटना घडली आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. . 'इव्हीएम मशीन्स आणि व्हीव्हीपॅट घेऊन हा ट्रक जम्बूसरहून भरूच शहरातील गोदामाकडे जात होता. त्याच दरम्यान हा अपघात झाला, अशी माहिती भरूचचे जिल्हाधिकारी संदीप सांगळे यांनी दिली. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी हे इव्हीएम मशीन्स आणि व्हीव्हीपॅट राखीव ठेवण्यात आले होते. त्याचा वापर करण्यात आला नव्हता. त्यामुळे या मशीन्स पुन्हा गोदामात नेण्यात येत असताना हा अपघात झाला, असंही ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत भाजपाने इव्हीएम मशिनमध्ये गडबड केल्याचा आरोप हार्दिक पटेलसह अनेक विरोधी पक्षांनी केला. गुजरात निवडणुकीत वापरण्यात आलेल्या 5 हजार इव्हिएम मशीन हॅक करण्यासाठी 140 अभियंते कामाला लागले असून त्याचं कंत्राट अहमदाबादच्या एका कंपनीला देण्यात आल्याचा धक्कादायक आरोप हार्दिक पटेलनं केला. हार्दिकच्या या आरोपनं खळबळ उडाली होती.