ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आल्यानंतर आज केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्वपक्षीयांची बैठक बोलावली आहे. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही बैठक सुरू होणार आहे. बैठकीत सहभागी होणारे सर्व राजकीय पक्ष ईव्हीएम गोंधळासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आपाआपले म्हणणे मांडणार आहेत.
ईव्हीएममध्ये गौडबंगाल असल्याचा आरोप करत विरोधकांकडून पुढील निवडणुकांत व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) सुविधेने युक्त इलेक्ट्रानिक व्होटिंग मशीनचा वापर करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.
या सर्वपक्षीय बैठकीत आम आदमी पार्टीचे प्रतिनिधीत्व आमदार सौरभ भारद्वाज करणार आहेत. ईव्हीएम गोंधळ मुद्याबाबत आम आदमी पार्टीनं दावा केला आहे की ईव्हीएममधील ROM च्या मदतीनं यंत्रात छेडछाड करण्यात आल्याचे सिद्ध केले जाऊ शकते. ईव्हीएममध्ये फेरफाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी आयोगाच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणीही आम आदमी पार्टीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.
#Delhi Meeting of all political parties with Election Commission regarding EVM issue & other Electoral Reforms, to take place at 10 AM today pic.twitter.com/n27Y7lyjS9— ANI (@ANI_news) May 12, 2017
यासंदर्भात पक्ष कार्यालयात मीडियासोबत संवाद साधताना "आप"चे राष्ट्रीय प्रवक्ता आणि आमदार सौरभ भारद्वाज यांनी सांगितले की, ईव्हीएम छेडछाडसंदर्भात चर्चा करताना दोन प्रश्न प्रामुख्यानं उपस्थित राहतात. पहिला प्रश्न, ईव्हीएममध्ये छेडछाड होऊ शकते? याचं उत्तर मंगळवारी दिल्ली विधानसभेत प्रात्यक्षिकाद्वारे दाखवण्यात आले. जे संपूर्ण पाहिलं. दुसरा प्रश्न असा आहे की, काही राज्यांमध्ये नुकत्याचा पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान ईव्हीएममध्ये छेडछाड झाली आहे का ? हा गोंधळ सिद्ध करण्यासाठी आम्हाला निवडणबक आयोगाच्या सहकार्याची गरज आहे.
अलीकडे वापरलेले कोणतेही एक ईव्हीएम आम्हाला द्या, आम्ही ते हॅक करून दाखवू, असे आव्हान आम आदमी पार्टीने गुरुवारी निवडणूक आयोगाला दिले. तत्पूर्वी पुढील निवडणुकांत व्होटर व्हेरिफायेबल पेपर आॅडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) सुविधेने युक्त इलेक्ट्रानिक व्होटिंग मशीनचा वापर करावा, या मागणीसाठी आपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गुरुवारी निवडणूक आयोगासमोर धरणे धरली.
आपने ईव्हीएमसारख्या उपकरणात फेरफार शक्य असल्याचे प्रात्यक्षिक दाखविले होते. मात्र, आयोगाने आपचा दावा फेटाळला होता. त्या पार्श्वभूमीवर आपने हे आव्हान दिले. हे प्रात्यक्षिक आंदोलकांत पक्षांच्या आमदारांसह दिल्लीचे नवनियुक्त समन्वयक गोपाल राय यांचा समावेश होता.