नवी दिल्ली : मध्य प्रदेश व मिझोरम या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या 230 जागांसाठी मतदान सुरू आहे. मात्र, काही ठिकाणी ईव्हीएम मशिनमध्ये गडबड झाल्याची शंका काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी याबाबत आपल्या ट्विटरवरुन माहिती दिली आहे.
मध्य प्रदेशमध्ये सकाळपासूनच विधानसभा निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट लढत पाहायला मिळणार आहे. येथे विधानसभेच्या 230 जागांसाठी मतदान होत आहे. त्यासाठी एकूण 5,04,95,251 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात 2,63,01,300 पुरुष, 2,41,30,390 महिला आणि 1389 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. तर, सकाळी 9 वाजेपर्यंत 6.32 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. मात्र, राज्यात जवळपास 70 पेक्षा जास्त ठिकाणी ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड असल्याची तक्रार आल्याचे राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. तसेच या मशिनला तात्काळ बदलण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ यांनी ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याने प्रश्न उपस्थित केला आहे. राज्यातील अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशिन खराब झाल्याची माहिती आहे. याचा मतदानावर परिणम होत आहे. मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या असून हा बिघाड कशामुळे असा प्रश्न कलमनाथ यांनी उपस्थित केला आहे. तसेच ज्या मशिनमध्ये बिघाड झाला आहे, व त्यांऐवजी बदलण्यात आलेल्या मिशनच्या नंबरची नोंद करणे आवश्यक आहे. तसेच मशिन सुरु करण्यापूर्वी 50 ते 100 मतदान करुन पाहावे, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.