काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. तसेच मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार आरक्षण संपुष्टात आणण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. चिदंबरम म्हणाले की, आर्थिक निकषावर १० टक्के EWS आरक्षण दिलं जात आहे, या कोट्यामुळे आरक्षण कमकुवत होत आहे, अशी टीकाही पी. चिदंबरम यांनी केली आहे. तसेच हे आरक्षण एक दिवस रद्द होईल, असं भाकितही त्यांनी केलं.
मुंबईत झालेल्या इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये नव्या भारतासाठी काँग्रेसची भूमिका या विषयावर आपलं मत मांडताना चिदंबरम यांनी आरक्षणाबाबत आपलं मत मांडलं. यावेळी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपा सत्तेत आल्यास संविधान धोक्यात येईल आणि आरक्षण संपुष्टात आणेल, अशा केलेल्या प्रचाराबाबत विचारले असता पी. चिदंबरम म्हणाले की, भाजपा घटनेमध्ये दुरुस्ती करणार आहे आणि त्यांच्याकडून याची तयारी सुरू होती.
चिदंबरम पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत बहुमत हुकलं तरी भाजपा घटनेमध्ये दुरुस्ती करण्याची योजना आखत आहे, मोदी सरकार आरक्षण संपुष्टात आणण्याची किंवा तसं काही करण्यासा मागेपुढे पाहणार नाही. ईडब्ल्यूएसमधून १० टक्के आरक्षण कामय ठेवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने २०२२ मध्ये दिलेल्या निकालाबाबत चिदंबरम म्हणाले की, पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने ३-२ अशा फरकाने याबाबतचा निकाल दिला होता. उर्वरित दोन न्यामूर्तींनी याबाबत नोंदवलेल्या अहसमतीबाबत कुणी वाचलंय का? एक दिवस ३-२ अशा बहुमताने दिलेला निकाल बदलताही येऊ शकतो. तसेच हे लवकरच होईल, अशी अपेक्षा आहे, असं भाकितही पी. चिदंबरम यांनी केलं.