नवी दिल्ली : ३,६०० कोटी रुपयांच्या अगुस्ता वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर भ्रष्टाचारप्रकरणी केंद्रीय तपास संस्थेने (सीबीआय ) सोमवारी माजी हवाईदल प्रमुख एस.पी. त्यागी यांची चौकशी केली. त्यागी सकाळी १० वाजता सीबीआय मुख्यालयात हजर झाले होते. हेलिकॉप्टर निर्माती कंपनी फिनमेकेनिका आणि अगुस्ता वेस्टलँडने हा सौदा पक्का करण्यासाठी दलालांच्या माध्यमाने भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिली होती यासंदर्भातील सविस्तर माहिती भारतीय उच्च न्यायालयाच्या समकक्ष मानल्या जाणाऱ्या कोर्ट आॅफ अपिल्सने दिली आहे. आदेशात अनेक ठिकाणी त्यागी यांच्या नावाचा उल्लेख आहे. याप्रकरणी सीबीआयने त्यागी, त्यांचे नातेवाईक आणि युरोपीयन दलालांसह १३ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. माजी हवाईदल प्रमुखांनी हेलिकॉप्टरच्या उड्डाणाची उंची ६,००० मीटरवरून कमी करून ४५०० मीटर केली होती. त्यामुळे अगुस्ता वेस्टलँडला बोलीत सहभागी होता आले, असा आरोप आहे.या हेलिकॉप्टरची सर्व्हिस सिलिंग (हेलिकॉप्टरचे काम करण्यासाठीची जास्तीतजास्त उंची) कमी केल्याने इंग्लंडच्या कंपनीला निविदेच्या स्पर्धेत सहभागी होता आले. अन्यथा हेलिकॉप्टर निविदा सादर करण्यास ही कंपनी अपात्र ठरली असती,असा सीबीआयचा आरोप आहे.मिलान न्यायालयाच्या आदेशाची प्रत सीबीआयला प्राप्त झाली असून त्यानुसार त्यागी यांना विचारण्यासाठी प्रश्नांचा एक संचच तयार केला आहे. त्यागी यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळताना उड्डाण मर्यादा कमी करण्याचा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गटाने घेतला होता, असा दावा केला आहे. (वृत्तसंस्था)तपास संस्थेने यापूर्वीही त्यागी यांची चौकशी केली होती. परंतु इटलीच्या न्यायालयाच्या आदेशानंतर प्रथमच त्यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते. त्यागींच्या नातेवाईकांचीही चौकशी होणार आहे.
माजी हवाई दलप्रमुखांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2016 1:47 AM