आसामचे माजी मुख्यमंत्री प्रफुल्ल कुमार महंत यांच्या विधानसभा क्वार्टरमध्ये (शासकीय निवासस्थान) बुधवारी पाणी आणि वीज कनेक्शन कापण्यात आले. कारण अनेक नोटिसा दिल्यानंतरही प्रफुल्ल कुमार महंत विधानसभा क्वार्टरमध्येच राहत होते. यासंदर्भातील माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
प्रफुल्ल कुमार महंत हे सध्या आमदार नाहीत, त्यामुळे त्यांना तिथे राहण्याचा अधिकार नाही, असे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. विशेष म्हणजे, आसाम राज्य सरकारचे सामान्य प्रशासन विभाग सन्माननीय लोकांसाठी निवास व्यवस्था करण्याचे काम पाहते. दुसरीकडे, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आसाम सचिवालय आमदारांच्या निवासासाठी नवीन निवासी संकुल बांधत आहे आणि सर्व आमदारांना जुनी निवासस्थाने रिकामी करण्यासाठी नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.
सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की, '15 ऑगस्टपर्यंत माजी मुख्यमंत्री प्रफुल्ल कुमार महंत वगळता सर्व आमदारांनी आपली घरे रिकामी केली, जे आता आमदार नाहीत आणि गेल्या अडीच महिन्यांपासून सात दिवसांची मुदत वाढवून देण्याची विनंती करत आहेत. जेव्हा प्रफुल्ल कुमार महंत 1985 मध्ये पहिल्यांदा आसामचे मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून ते तीन क्वार्टरला मिळून तयार केलेल्या विधानसभा भवन संकुलातील घरात राहत होते.
याचबरोबर, अधिकाऱ्याने सांगितले की, माजी मुख्यमंत्र्यांना विनंती केल्यावर तेथे राहण्याची परवानगी देण्यात आली होती. पण, आता सलग अनेक वेळा नोटीस देऊनही ते क्वार्टर रिकामे करत नसल्याने विभागाला तेथील पाणी व वीज कनेक्शन तोडावे लागले. मात्र, दुसरीकडे, प्रफुल्ल कुमार महंत यांच्या पत्नी जॉयश्री गोस्वामी महंत यांनी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांच्या सरकारच्या अधिकाऱ्यांवर आरोप करत, त्यांनी आधीच नवीन घरात स्थलांतरित झाल्याचा दावा केला आहे.