नवी दिल्ली : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांचे सोमवारी (१३ मे) निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते कर्करोगाने त्रस्त होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे बिहारमध्ये शोककळा पसरली आहे.
सुशील कुमार मोदी हे बिहारमधील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते. दरम्यान, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी एक्सवर पोस्ट करून सुशील कुमार मोदी यांच्या निधनाची माहिती दिली आणि दु:खही व्यक्त केले. सम्राट चौधरी यांनी म्हटले की, "बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि माजी राज्यसभा खासदार श्री सुशील कुमार मोदी यांना त्यांच्या निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली. बिहार भाजपाचे हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे."
सुशील कुमार मोदी यांनी ३ एप्रिल रोजी स्वत:ला कर्करोग झाल्याची माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, "गेल्या ६ महिन्यांपासून मी कर्करोगाशी झुंज देत आहे. आता मला वाटले की लोकांना सांगायची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीत मी काहीही करू शकणार नाही. सर्व काही पंतप्रधानांना सांगितले आहे. देश, बिहार आणि पक्षासाठी नेहमीच कृतज्ञ आणि नेहमीच समर्पित."
बिहारच्या राजकारणात सुशील कुमार मोदी यांचा मोठा दबदबा होता. विद्यार्थी राजकारणातून ते सक्रिय राजकारणात आले होते. १९९० मध्ये ते बिहार विधानसभेत पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. यानंतर १९९५ आणि २००० मध्येही ते आमदार झाले. म्हणजेच ते सलग तीन वेळा आमदार होते. १९९५ मध्ये सुशील कुमार मोदी हे भाजपाचे चीफ व्हिप बनले होते. तसेच, १९९६ ते २००४ पर्यंत सुशील कुमार मोदी हे बिहार विधानसभेत विरोधी पक्षनेते होते.