नवी दिल्ली - सीमेपलीकडून दहशतवाद्यांची घुसखोरी सुरू आहे आणि दहशतवाद्यांनापाकिस्तानी लष्कर अगदी उघडपणे मदत करत असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं. पाकिस्तानी सैन्यानं शुक्रवारी जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरपासून गुरेज सेक्टरपर्यंत नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात पाच जवान शहीद झाले. याशिवाय नागरिकांचा मृत्यू झाला. पाकिस्तानच्या नापाक कारवायांना भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलं. यात पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं.
पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाच्या नेत्या आणि जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu and Kashmir) माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी भारत-पाकिस्तानला चर्चा सुरू करण्याचा सल्ला दिला आहे. "भारत आणि पाकिस्तान दोघांनी राजकीय अपरिहार्यता बाजूला ठेवून आता चर्चा सुरू करावी. एलओसीच्या दोन्ही बाजूला होणारी जीवितहानी पाहून वाईट वाटते" असं मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. तसेच "सीमेवरील अशा घटना रोखण्यासाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी शस्त्रसंधी करार केला होता. तो करार पूर्ववत करावा" अशी मागणी मुफ्ती यांनी केली आहे.
एलओसीवरील गोळीबाराविरोधात भारत आक्रमक; पाकिस्तानी राजदूतांना समन्स
भारतीय सैन्याच्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे 11 सैनिक मारले गेले आणि 12 जण जखमी झाले. याशिवाय पाकिस्तानी सैन्याचे बंकर आणि लॉन्च पॅडदेखील उद्ध्वस्त झाले. नियंत्रण रेषेवर वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तान विरोधात भारतानं आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला भारताकडून समन्स बजावण्यात आलं आहे. भारतानं पाकिस्तानच्या नापाक कारवायांचा निषेध केला आहे.
पाकिस्तानी सुरक्षा दलांकडून भारताच्या सीमावर्ती भागातील नागरिकांना नाहक लक्ष्य केलं जात आहे. त्याबद्दल भारतानं अतिशय कठोर शब्दांत आपला निषेध नोंदवला असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली. 'उत्सव काळात नियंत्रण रेषेवर सुरू असलेला बेछूट गोळीबार आणि त्या माध्यमातून शांतता भंग करण्याचा प्रयत्न अतिशय निंदनीय आहे. पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या 'चार्ज डी अफेयर्स'ना समन्स बजावण्यात आलं. सीमेवर पाकिस्तानकडून विनाकारण सुरू असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा निषेध त्यांच्या समक्ष करण्यात आला,' अशी माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली.
"तरुणांना नोकरी न मिळाल्यास त्यांच्याकडे शस्त्र उचलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही"
"तरुणांना नोकरी मिळाली नाही तर त्यांच्याकडे शस्त्र उचलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही" असं मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी बिहारमधील निवडणुकवर देखल भाष्य केलं आहे. "मी तेजस्वी यादव यांचे अभिनंदन करू इच्छिते कारण इतके लहान असूनही त्यांनी बिहारमध्ये अन्न, वस्त्र, रोजगार, निवारा आणि कलम 370, 35 अ , जमीन खरेदी चालू दिले नाही. आज यांची वेळ आहे. उद्या आपल्या सर्वांची वेळ येईल. अमेरिकेत ट्रम्प यांच्यासोबत जे झालं तेच यांच्यासोबत देखील होणार आहे" असं मुफ्ती यांनी म्हटलं आहे. जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमधील लोकांची जमीन आणि नोकरीचा अधिकार हिरावून घेतला आहे असं देखील म्हटलं आहे.