श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती आपल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. जम्मू-काश्मीरमधील स्थानिक दहशतवादी हे भूमिपुत्र असल्याचं सांगत त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. तसेच काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी केंद्राने पुढाकार घेत दहशतवाद्यांच्या प्रमुखांशी चर्चा केली पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
मेहबुबा मुफ्ती यांनी अनंतनाग येथे ‘सध्या पाकिस्तान आणि फुटीरतावाद्यांशी चर्चा होणं गरजेचं आहे. याचप्रमाणे दहशतवाद्यांचं नेतृत्व करणाऱ्यांशीही चर्चा केली पाहिजे कारण त्यांच्याकडे शस्त्र आहेत आणि तेच ही शस्त्र संस्कृती संपवू शकतात’ असं म्हटलं आहे. तसेच ‘मला वाटतं एका ठराविक वेळेनंतर हुरियत कॉन्फरन्स आणि दहशतवाद्यांशी चर्चा झालीच पाहिजे’, असं ही म्हटलं आहे.