बलवंत तक्षक
चंडीगड : ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती प्रकरणात हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना दिल्लीतील न्यायालयाने दोषी ठरविले आहे. त्यांना २६ मे रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. सीबीआयने २६ मार्च २०१० रोजी चौटाला यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. यात म्हटले होते की, चौटाला यांनी १९९३ ते २००६ या काळात ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक ६.०९ कोटी रुपयांची अधिक संपत्ती जमा केली आहे. अर्थात, हे आरोप राजकीय द्वेषातून करण्यात आल्याचा दावा नेहमीच चौटाला कुटुंबीयांनी केलेला आहे.
ईडीने २०१९ मध्ये चौटाला यांची ३ कोटी ६८ लाख रुपयांची संपत्ती जप्त केली होती. यात फ्लॅट, प्लॉट आणि जमीन यांचा समावेश होता. ही संपत्ती नवी दिल्ली, पंचकुला आणि सिरमा येथील आहे. मनी लाँड्रिंग अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्यानतर ही कारवाई झाली होती. चौटाला यांना यापूर्वी जानेवारी २०१३ मध्ये जेबीटी भरती घोटाळ्यातही दोषी ठरविण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना या प्रकरणात १० वर्षांची शिक्षा सुनावली होती. चौटाला हे मागील वर्षीच शिक्षा पूर्ण करून दिल्लीच्या तिहारमधून बाहेर आले होते.
मुलेही अडचणीत...
चौटाला यांना दोषी ठरविल्यानंतर त्यांची मुले अजय सिंह चौटाला आणि अभय सिंह चौटाला यांच्या अडचणीही वाढल्या आहेत. कारण, या दोन मुलांवरही ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीचे प्रकरण सुरू आहे.