नवी दिल्ली : दिल्लीच्या एका प्रतिष्ठित महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेणाऱ्या एका माजी लष्करी अधिकाऱ्याच्या मुलीने जगातील सर्वाधिक निर्दयी समजल्या जाणाऱ्या इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अॅण्ड सिरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेत सामील होण्याची जिद्द पकडली असून इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी तिच्या डोक्यात शिरलेले हे वारे काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.अलिकडच्या काळात भारतातील तरुण इसिसकडे आकर्षित होत असल्याचे चित्र समोर आले असून त्यांना रोखण्याकरिता सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. अशातच या तरुणीची ही इच्छा ऐकून गुप्तचर यंत्रणेला हादरा बसला आहे.या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार या तरुणीचे वडील भारतीय लष्करात लेफ्टनंट कर्नल होते. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी ती आॅस्ट्रेलियाला गेली होती. परंतु तेथून परतल्यानंतर ती पूर्णपणे बदलली होती. तिच्या वडिलांनी काही महिन्यांपूर्वी तिच्या संगणकावर काही संवाद बघितले. पाठपुरावा केला तेव्हा आपली मुलगी इसिसमध्ये भरती करणाऱ्या लोकांच्या संपर्कात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मुलगी सिरियात जाऊन इसिसमध्ये सामील होण्याची योजना आखत असल्याचे बघून त्यांना मोठा धक्का बसला. धर्मांतर करून आॅस्ट्रेलियामार्गे सिरियाला जाण्याची तयारी तिने चालविली होती. ही संपूर्ण माहिती खुद्द या तरुणीच्या वडिलांनी राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) दिली आणि मदतीचीही विनंती केली. एनआयएने यासंदर्भात आयबीशी संपर्क केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
माजी कर्नलच्या मुलीच्या डोक्यात इसिसचे भूत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2015 11:25 PM