चेन्नई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसी मतदारसंघातून प्रमुख पक्षांनी अद्याप कोणताही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला नाही. मात्र, आता नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्यासाठी एक निवृत्त न्यायाधीश मैदानात उतरणार आहेत. आयएएनएसच्या माहितीनुसार मद्रास आणि कोलकाता हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश सी. एस. कर्णन वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.
सी. एस. कर्णन यांनी याविषयी सांगितले की, 'मी नरेंद्र मोदींच्याविरोधात वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्राथमिक स्वरुपाचे काम सुरु आहे.' विशेष म्हणजे, सी. एस. कर्णन यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आधीच केरळमधील मध्य चेन्नई मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सी. एस. कर्णन यांनी 2018 मध्ये अँटी-करप्शन डायनॉमिक पार्टीची (ACDP) स्थापना केली आहे. या पार्टीचे उमेदवार म्हणून सी. एस. कर्णन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सी. एस. कर्णन यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. त्यांनी सरन्यायाधीश जे. ए. खेहर यांच्यासह न्यायालयीन व्यवस्थाबाबत बंड पुकारले होते. याप्रकरणी न्यायव्यवस्थेचा अवमान केला असल्याचा आरोप ठेवत सर्वोच्च न्यायालयाने सी. एस. कर्णन यांना ही शिक्षा ठोठावली होती. न्यायधीश म्हणून कार्यरत असताना अशाप्रकारे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आलेले सी. एस. कर्णन हे देशातील पहिलेच न्यायाधीश आहेत.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. तसेच, या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे.