Women Murder Case ( Marathi News ) :उत्तर प्रदेशातील लखनौ इथं झालेल्या सेवानिवृत्त आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्या प्रकरणाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून या आरोपींमध्ये आयएएस अधिकारी देवेंद्रनाथ दुबे यांच्या वाहनाचे दोन्ही चालक आणि त्यांच्या एका साथीदाराचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रवी, अखिलेश आणि रंजीत अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींना पकडताना पोलिसांची त्यांच्यासोबत झटापट झाली. यावेळी आरोपी अखिलेश याला गोळीही लागली. त्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. माजी आयएएस अधिकारी देवेंद्रनाथ दुबे यांच्या घरातील लाखो रुपये किंमतीचे दागिने लुटण्यासाठी आरोपींनी दुबे यांच्या पत्नीची हत्या केली आणि दागिने घेऊन ते पसार झाले होते.
नेमकं काय घडलं?
सेवानिवृत्त आयएएस अधिकारी देवेंद्र दुबे हे दररोज सकाळी ७ वाजताच्या आसपास गोल्फ खेळायला जात असत. त्यानंतर ७ ते ७.१५ वाजताच्या आसपास दूधवाला दूध देऊन जात असे आणि घरकाम करणारी महिला ८ ते ८.३० आसपास येत असे. त्यामुळे गुन्हेगारांनी दुबे यांच्या घरात घुसण्यासाठी मधली वेळ निवडली आणि दूधवाले जाताच दोन तरुण निळ्या रंगाच्या स्कुटीवर आतमध्ये आले. या तरुणांनी सीसीटीव्हीतून आपली ओळख स्पष्ट होऊ नये, यासाठी हेल्मेटदेखील घातले होते.
चोरांना घरात घुसण्यासाठी कोणताही संघर्ष करावा लागला नसल्याचं पोलीस तपासातून स्पष्ट झालं होतं. आरोपींमध्ये मोहिनी दुबे यांच्या ओळखीचं कोणीतरी असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली होती. तपासात यावरही शिक्कामोर्तब झालं. अखिलेश या आपल्या वाहनचालकाला पाहूनच मोहिनी दुबे यांनी घराचा दरवाजा उघडला होता.
घरात प्रवेश करताच आरोपींनी आधी मोहिनी दुबे यांचा गळा दाबून खून केला आणि नंतर घरातील ५० लाख रुपये किंमतीचे दागिने घेऊन आरोपी प्रसार झाले होते. याप्रकरणी आता अखेर आरोपांनी बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं असून परिचयातील लोकांनीच दुबे यांचा घात केल्याचं स्पष्ट झालं आहे.