वारंगळ (तेलंगण): काँग्रेसचे माजी खासदार सिरसिला राजय्या यांच्या राहत्या घराच्या एका मजल्यास लागलेल्या भीषण आगीत राजय्या यांची सून आणि तीन नातवंडे बुधवारी सकाळी रहस्यमय स्थितीत जळून मृत्युमुखी पडल्याने खळबळ उडाली आहे. सुनेचा हुंड्यासाठी छळ केला जात होता, अशी तक्रार तिच्या माहेरच्या मंडळींनी केल्याने पोलिसांनी राजय्या, त्यांची पत्नी आणि मुलास जाबजबाबासाठी ताब्यात घेतले.राजय्या यांची सून एस. सारिका आणि अभिनव (७ वर्षे) व अयान व श्रीयान (दोघेही ३ वर्षे) या तीन नातवंडांचा जळाल्याने घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. खोलीत एका गॅस सिलिंडरचे रेग्युलेटर उघडे असल्याचे आढळून आले. राजय्या यांचे घर वारंगळच्या हमानकोंडा भागात आहे.वारंगळचे पोलीस आयुक्त जी. सुधीर बाबू यांनी सांगितले की, ही घटना घडली तेव्हा स्वत: राजय्या, त्यांच्या पत्नी माधवी आणि मुलगा अनिलकुमार हे घरातच होते. या तिघांनाही जाबजबाबासाठी पोलीस स्टेशनला आणण्यात आले असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. पुरावे मिळाल्यावर कारवाई करण्यात येईल.(वृत्तसंस्था)अपघात की खून?मुळची निजामाबाद जिल्ह्यातील असलेली सारिका लग्नाआधी एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीस होती. सारिकाच्या आई आणि बहिणीने राजय्या कुटुंबावर हत्येचा आरोप केला आहे. सारिकाचा सासरची मंडळी छळ करीत होती,असे त्यांचे म्हणणे आहे. माझी बहीण आत्महत्या करू शकत नाही. तिला त्रास देऊन ठार मारण्यात आले,असा आरोप मृत सारिकाच्या बहिणीने केला. यापूर्वी एप्रिल २०१४ मध्ये स्वत: सारिकाच्या तक्रारीवरून राजय्या, त्यांची पत्नी माधवी, मुलगा एस.अनिलकुमार आणि अन्य एका महिलेविरुद्ध बेगमपेट महिला पोलीस स्टेशनला हुंड्यासाठी छळ व मारहाणीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यावेळी सारिकाने आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध राजय्या यांच्या घरासमोर धरणे आंदोलनही केले होते. निवडणुकीतून माघारसोमवारी सिरसिला राजय्या यांनी उमेदवारी अर्जही भरला होता. परंतु या घटनेमुळे त्यांनी पोटनिवडणूक लढविण्यास असमर्थतता दर्शविली असून पक्षश्रेष्ठींनी त्यांची विनंती मान्य केली आहे. पक्षातर्फे आता माजी केंद्रीय मंत्री सारवे सत्यनारायण हे उमेदवार असतील.
माजी खासदाराच्या सून, नातवांचा गूढ मृत्यू
By admin | Published: November 05, 2015 2:47 AM