नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेत्यांविरोधात अनुचित, भीती आणि दहशतीच्या भाषेचा प्रयोग करता कामा नये, अशी मागणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली आहे. मनमोहन सिंग यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात मोदींना याविषयी समज द्यावी, असे म्हटले आहे. ६ मे रोजी कर्नाटकात हुंबळी येथे झालेल्या मोदींच्या सभेचा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आला आहे. काँग्रेस नेत्यांनी कान खोलून ऐकावे, जर तुम्ही तुमची मर्यादा ओलांडणार असाल तर हा मोदी आहे, तुम्हाला किंमत चुकवावी लागेल असे मोदी या सभेत म्हणाले होते. या विधानाचा संदर्भ देत मनमोहन सिंग यांनी पत्रात म्हटले आहे की, पंतप्रधानांनी काँग्रेस नेतृत्वाबद्दल जी धमकीची भाषा वापरली त्याचा निषेध केला पाहिजे. लोकशाही देशातील पंतप्रधानाच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. सार्वजनिक किंवा खासगी कार्यक्रमात अशा प्रकारचे भाषण योग्य नाही.
या पत्रावर मनमोहन सिंग यांच्याबरोबरीने मल्लिकार्जून खर्गे, पी. चिंदबरम, अंबिका सोनी, आनंद शर्मा, मोतीलाल व्होरा, करण सिंह, अहमद पटेल आणि कमल नाथ या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. पत्राच्या प्रारंभी नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची जी शपथ घेतली होती त्याचा उल्लेख आहे.