नवी दिल्ली - लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनी सैन्याने केलेली घुसखोरी आणि नंतर भारत आणि चिनी सैन्यामध्ये झालेल्या झटापटीत २० भारतीय जवानांना आलेले वीरमरण यामुळे सध्या देशातील वातावरण तापलेले आहे. दरम्यान, शुक्रवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनने भारताच्या हद्दीत घुसखोरी केली नसल्याचे, तसेच भारताची कुठलीही चौकी चीनच्या ताब्यात नसल्याचे विधान केल्याने मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. मोदींच्या या विधानाविरोधात लष्करातील अनेक निवृत्त अधिकाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
या संबोधनादरम्यान, मोदींनी भारत हा शांतता आणि मित्रत्वावर विश्वास ठेवतो. मात्र आपले सार्वभौमत्व आणि अखंडत्वही कायम राखण्यासाठी कटिबद्ध आहे असे सांगितले होते. दरम्यान, मोदींनी चिनी घुसखोरीबाबत केलेल्या विधानाचा तीव्र शब्दांत विरोध करत भारतीय लष्करातील अनेक निवृत्त अधिकाऱ्यांनी ट्विटरवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
लेफ्टनंट जनरल प्रकाश मेनन मोदींच्या विधानाबाबत नाराजी व्यक्त करताना म्हणाले की, चीन भारताच्या हद्दील घुसलेला नाही, असे सांगून पंतप्रधान मोदींनी आरएमने सांगितलेल्या गोष्टीचे खंडन केले आहे. आपण चीनचा दावा मान्य केला आहे का? सुरुवातीला तर आपण चीन गलवानमध्ये घुसल्याचे अधिकृतरीत्या हे मान्य केले होते.
अजय शुक्ला आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, मी आताच टीव्हीवर नरेंद्र मोदी यांना भारत चीन सीमारेषेची पुनर्रचना करताना पाहिले. मोदींनी कुणीही भारताच्याय हद्दीत घुसला नसल्याचे सांगितले. गलवान खोरे आणि पँगाँग सरोवराजवळील फिंगर्स ४-८ आपले असल्याचा चीनने केलेला दावा त्यांनी मान्य केला आहे का?
लेफ्टनंट जनरल रामेश्वर रॉय यांनीही आपल्या ट्विटमधून मोदींविरोधात संताप व्यक्त केला आहे. आजचा दिवस दुर्दैवी आहे. मी आज निवृत्त आहे आणि माझा मुलगा लष्करात नाही, यासाठी मी माझ्या तीन स्टार्सचे आभार मानतो, असे ते म्हणाले.
मी चार दशके देशाची सेवा केली ती कशासाठी तर देशाच्या एकात्मता आणि अखंडतेसाठी. मात्र पूर्व लडाखमध्ये चीन एलएसी बदलत असून, भारत ते मान्य करत आहे, हे पाहून मला धक्का बसला आहे. माझ्यासारख्या प्रत्येक सैनिकासाठी हा दु:खद दिवस आहे, असे रामेश्वर रॉय पुढच्या ट्विटमध्ये म्हणाले.
माजी लष्करी अधिकारी सँडी थापर आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, तर भाताच्या भूमीवर कुठलेही अतिक्रमण झाले नाही आणि भारताने आपली एकही चौकी गमावली नाही. आपले जवाना चीनच्या भूमीवर त्यांना हटवण्यासाठी गेले नाहीत? हेच तर चीनकडून सांगण्यात येत आहे. १६ बिहारच्या वीर जवानांचे बलिदान विसरण्यासाठी भारताला केवळ ४८ तास लागले, ही लाजिरवाणी बाब आहे.
बीरेंद्र धनोआ यांनीही अशीच संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मारता मारता कुठे मरण आले हे विचारण्याची आम्हाला परवानगी आहे का?
कर्नल संजय पांडे यांनीही मोदींच्या विधानाविरोधात संताप व्यक्त केला आहे. आता चीनला भारताचा भूभाग हडप करण्याचा परवाना मिळाला आहे. ते अतिक्रमण करत नाही आहेत. त्यांनी भारताची कुठलीही जमीन बळकावली नाही. २० जवानांनी आत्महत्या केली. बाकी सर्व ठीक आहे. द ग्रेट चायना लँड माफिया सपोर्टेड बाय इंडिया
मेजर डीपी सिंह यांनीही मोदींच्या विधानाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधानांचे भाषण ऐकले, कुणी माझे किंवा अन्य जवानांचे मनोधैर्य कमी करू शकत नाही, मला वाटले ते आमचे मनोबल अजून वाढवतील. पण मी चुकीचा होतो.