“दावा ३० कोटींचा, पण खरं लसीकरण ४ कोटीच”; माजी केंद्रीय मंत्र्याचा सरकारवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 02:59 PM2021-05-22T14:59:15+5:302021-05-22T15:03:51+5:30
माजी केंद्रीय मंत्र्यानं लसीकरणाच्या वेगावर व्यक्त केली चिंता. आम्हाला लस हवी आहे, मगरीचे अश्रू नकोत, काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्यांचं वक्तव्य.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारनं लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. १ मे पासून देशात १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला मंजुरी दिली आहे. परंतु अनेक ठिकाणी लसींची कमतरता असल्याचा दावा केला जात आहे. अशा परिस्थितीत माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी करोनाच्या लसीकरणावर (Covid Vaccination) वेगावर चिंता व्यक्त केली आहे. तसंच त्यांनी मोदी सरकारवर (Narendra Modi Government) निशाणा साधला आहे. आम्हाला लस हवी आहे, अश्रू नकोत, असंही ते म्हणाले आहेत.
“केंद्र सरकारनं २१ जानेवारी २०२१ रोजी दावा केला होता की जुलै अखेरपर्यंत ३० कोटी भारतीयाचं पूर्ण लसीकरण केलं जाईल. परंतु सत्य हे आहे की २२ मे २०२१ पर्यंत केवळ ४.१ कोटी भारतीयांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत,” असं जयराम रमेश म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्रावर निशाणा साधला.
“केंद्र सरकारनं २१ मे रोजी दावा केला होता की २०२१ च्या अखेरपर्यंत भारतात सर्व ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण केलं जाईल. परंतु सत्य हे आहे की २१ मे रोजी एका दिवसात केवळ १४५ लाख लोकांचं लसीकरण करण्यात आलं. आम्हाला लस हवी आहे मगरीचे अश्रू नकोत,” असंही ते म्हणाले.
Claim—Jan 2021: Modi Govt will vaccinate 30cr Indians fully by July end.
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) May 22, 2021
Reality—22nd May: 4.1cr Indians got both doses.
Claim—21st May: India will fully vaccinate all adults by end of 2021.
Reality—21st May: Only 14 lakh vaccinated whole day.
We need vaccines, not tears! https://t.co/mqLM9CaUG9
मोदी झाले होते भावूक
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या काही राज्यांतील जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे संवाद साधला होता. त्यासोबतच, डॉक्टर्स, पॅरामेडीकल स्टाफ आणि फ्रंटलाईन वर्कर्संसोबतही चर्चा केली. त्यांनी वाराणसीतील जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागातील फ्रंटलाईन वर्कर्संशी संवाद साधला. त्यावेळी, कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांबद्दल बोलताना मोदी भावूक झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीमधील डॉक्टरांशी बोलताना प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे तोंडभरून कौतुक केलं. तसेच, कोरोना आटोक्यात आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या कामाचंही कौतुक केलं. मात्र, कोविडच्या लढाईत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांचा उल्लेख करताना मोदी भावूक झाल्याचं पाहायला मिळालंय. कोरोनाच्या लढाईत आपण अनेक आप्तेष्ठांना गमावलंय. मी काशीचा एक सेवक असून काशीतील प्रत्येकाचे आभार मानतो. विशेषत: डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्य सेवकांनी जे काम केलंय, ते कौतुकास्पद आहे. या महामारीने आपल्या जवळील माणसं नेली आहेत. त्या सर्वांना मी श्रद्धांजली वाहतो, त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे, असंही मोदी म्हणाले होते.