भाजपाने वरुण गांधींना डावलून काँग्रेसचे दोन वेळचे माजी खासदार व आता योगी मंत्रिमंडळात असलेले मंत्री जितीन प्रसाद यांना लोकसभेचे तिकीट दिले आहे. पिलीभीत मतदारसंघातून वरुण गांधी यांचे तिकीट कापण्यात आले आहेत. होळीच्या दिवशी प्रसाद मतदारसंघात आले होते. त्यांनी अनेकजण या जागेवरून लोकसभेसाठी इच्छुक होते, असे म्हटले आहे.
संपूर्ण देशाच्या नजरा या मतदारसंघावर आहेत. सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी आता वाढली आहे. भाजपा नेतृत्वाने माझ्यावर विश्वास दर्शविला आहे. ही भाजपा आहे, एकदा निर्णय झाला की त्याचा सर्वजण सन्मान करतात, अशा शब्दांत प्रसाद यांनी वरुण यांना टोला लगावला आहे.
वरुण गांधी यांना तिकीट न मिळाल्याने बंडखोरी होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात आधी मेनका गांधी यांचे वर्चस्व होते. २०१९ मध्ये वरुण गांधी या जागेवरून निवडून आले होते. त्यापूर्वी ते सुल्तानपूरचे खासदार होते. जितीन प्रसाद हे २००४ मध्ये शाहजहापूर, २००९ मध्ये धौरहरा लोकसभा मतदारसंघांतून खासदार झाले होते. दोनदा ते केंद्रात मंत्रीही राहिले आहेत. २०२१ मध्ये ते भाजपात आले होते.
भाजप विकासासाठी काम करत आहे. मोदी १० वर्षांचा विकास दाखवतील. यापूर्वी काही लोकांनाच योजनांचा लाभ मिळत होता. राज्यात कायदा व सुव्यवस्था कोलमडली होती. योजनांचा लाभ जनतेला मिळत नव्हता. आज बदल दिसत आहे आणि लोकांना त्याचा लाभ मिळत आहे.