नवी दिल्ली : विदेशात नेमका किती काळा पैसा दडून आहे, याची योग्य माहिती सरकारकडे उपलब्ध नसल्याची कबुली अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी राज्यसभेत खा. विजय दर्डा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. निवडणुकीत रालोआने विदेशी बँकांमधील काळा पैसा परत आणण्याचा मुख्य मुद्दा बनवून लोकप्रियता मिळविली होती, हे उल्लेखनीय.देशात आणि देशाबाहेर पडून असलेले बेनामी उत्पन्न आणि पैशाचा छडा लावण्यासाठी राष्ट्रीय सार्वजनिक अर्थ आणि धोरण संस्था (एनआयपीएएफपी), राष्ट्रीय प्रायोगिक आर्थिक संशोधन परिषद (एनसीएईआर) आणि राष्ट्रीय अर्थ व्यवस्थापन संस्थेमार्फत (एनआयएफएम) अभ्यास केला जात आहे, असे उत्तरात सिन्हा यांनी सांगितले.विदेशी बँकांमध्ये किती काळा पैसा दडून आहे. सरकार त्याबाबत काही आढावा घेत आहे काय? आणि नसेल तर त्यामागचे कोणते कारण आहे. सरकारने आढावा घेण्याची कोणती योजना आखली आहे? असा प्रश्न खा. दर्डा यांनी विचारला होता. उपरोक्त संस्थांकडे अभ्यासाचे काम सोपविताना विशिष्ट विषयांच्या रूपात कामाची रूपरेखा निर्धारित करण्यात आली होती, असे सिन्हा यांनी नमूद केले. सिन्हा यांनी नंतरच्या प्रश्नांवर नकारात्मक उत्तर दिले.
विदेशात नेमका किती काळा पैसा, माहीत नाही
By admin | Published: December 17, 2014 1:14 AM