भोपाळ - परीक्षेच्या निकालामध्ये अनेकदा एखाद्या विषयात कमी गुण मिळाल्यावर विद्यार्थ्यांची हताशा होत असते. मात्र यातील अगदीच मोजके जण त्याविरोधात फेरतपासणीसाठी जातात. मात्र मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यामधील बारावीचा विद्यार्थी शांतनू शुक्ला याने १२वीच्या गुणपत्रिकेत एक गुण वाढवण्यासाठी माध्यमिक शिक्षण मंडळाविरोधात तब्बल तीन वर्षे न्यायालयीन लढाई लढली. अखेर तीन वर्षांनंतर त्याच्या लढ्याला यश आलं आणि जेव्हा त्याच्या उत्तर पत्रिकेची पुनर्तपासाणी झाली तेव्हा त्याला एका गुणाऐवजी तब्बल २८ गुण वाढवून मिळाले.
मात्र हे २८ गुण वाढवून घेण्यासाठी या विद्यार्थ्याला तब्बल ४० वेळा तारखेला हजर राहावे लागले. तसेच खटला लढण्यासाठी तीन वर्षांत सुमारे १५ हजार रुपये खर्च करावे लागले. १२वीच्या परीक्षेत त्याला ७४.८ टक्के गुण मिळाले होते. त्यानंतर त्याने हायकोर्टात धाव घेतली आणि एका गुणाऐवजी तब्बल २८ गुण वाढवून मिळाले.
सागर जिल्ह्यातील परकोटा येथील विद्यार्थी शांतनू शुक्ल याने १२वीमध्ये चांगला अभ्यास केला होता. २०१८ मध्ये मध्य प्रदेश बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत ७४.८ टक्के गुणांनी तो उत्तीर्ण झाला होता. मात्र आपल्याला बारावीत ७५ ते ८० टक्के गुण मिळतील, असा विश्वास शांतनूला होता. मात्र एक गुण कमी पडल्याने त्याला ७५ टक्के गुण मिळवता आले नाहीत. तसेच त्याला मुख्यमंत्री मेधावी योजनेचाही लाभ घेता आला नाही. मात्र आता न्यायालयीन लढाईनंतर शांतनूचे २८ गुण वाढल्याने त्याची टक्केवारी ८१ टक्क्यांपर्यंत जाणार आहे. तसेच त्याला मेधावी योजनेचा अर्जही भरता येणार आहे.
शांतनूने सांगितले की, कोरोनामुळे दोन वर्षे या खटल्याची सुनावणी होऊ शकली नव्हती. सुनावणी सुरू झाली तेव्हा कोर्टाने बोर्डाला ६ नोटीस पाठवल्या. मात्र त्यांच्याकडून काही भूमिका मांडण्यात आली नाही. फेरतपाणसीसाठी अर्ज केल तेव्हा त्यात एकही गुण वाढला नाही. त्यानंतर विविध विषयांच्या पेपरची कॉपी काढली. त्यात प्रश्नांची उत्तरे योग्य असल्याची टीक होती.मात्र त्याचे गुण दिले गेले नव्हते. त्यानंतर २०१८ मध्ये मी याचिका दाखल केली होती. कोर्टाने सुनावणी करताना माध्यमिक शिक्षण मंडळाला पुन्हा मूल्यांकन करण्याचे आदेश दिले. २१ फेब्रुवारी रोजी नवीन मार्कशिट मिळालं ज्यामध्ये ८०.४ टक्के गुण मिळाल्याचा उल्लेख आहे.