नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट आली असली तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य लक्षात घेता १२ वीची परीक्षा घ्यायलाच हवी, असे मत महाराष्ट्र वगळता बहुतांश राज्यांनी व्यक्त केले आहे. या परीक्षेबाबत केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक १ जून रोजी महत्त्त्वाची घोषणा करणार आहेत. बारावीची परीक्षा कशी घ्यावी, याबाबत सीबीएसईने दोन पर्याय मांडले आहेत. तसेच राज्यांतील शिक्षण मंडळे १२वीच्या परीक्षेबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात, असेही सीबीएसईने म्हटले आहे.१२ वीच्या परीक्षेबद्दल राज्यांनी आपली मते मंगळवारी, २५ मेपर्यंत केंद्र सरकारला कळवावीत, असे सांगण्यात आले आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत झालेल्या बैठकीला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर, संजय धोत्रे यांच्यासमवेत विविध राज्यांचे शिक्षणमंत्री उपस्थित होते. कोरोना साथीमुळे १२ वीची परीक्षा न घेता वेगळा मार्ग काढावा, असे मत महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या बैठकीत व्यक्त केले.१२ वीची परीक्षा घेण्यापूर्वी सर्व परीक्षार्थींना लस देण्यात यावी, अशी सूचना दिल्ली व केरळच्या राज्य सरकारांनी केली आहे. पश्चिम बंगालने मात्र १२वीची परीक्षा रद्द करण्याबाबत अद्याप काहीही ठरविले नसून एक आठवड्यानंतर यावर निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. १२ वीची परीक्षा होणार की होणार नाही, याविषयी पालक व विद्यार्थ्यांच्या
मनात जो गोंधळ निर्माण झाला आहे तो दूर करण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक यांची सुरक्षा लक्षात घेऊनच योग्य निर्णय लवकरच घेण्यात येईल असे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितले.
छत्तीसगडमध्ये घरी बसून १२वीची परीक्षारायपूर : छत्तीसगडमधील परीक्षा मंडळाने तर विद्यार्थ्यांना घरून पेपर लिहिण्याची संधी दिली आहे. मंडळाने १२वीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांवरून प्रश्नपत्रिका गोळा करण्याची व घरी जाऊन उत्तरपत्रिका लिहिण्याची अनुमती दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका घरी घेऊन गेल्यानंतर पाच दिवसांत उत्तरपत्रिका मंडळाकडे पाठविण्याचे आदेशही मंडळाने दिले आहेत.
सीबीएसई दोन पर्याय सीबीएसईने १२वीची परीक्षा घेण्याबद्दल दोन प्रस्ताव राज्यांसमोर ठेवले. त्यातील पहिला प्रस्ताव म्हणजे केवळ काही प्रमुख विषयांसाठी १२वीची परीक्षा घेतली जावी.सीबीएसई १२ वीसाठी १७४ विषयांत परीक्षेचे आयोजन करते. त्यातील २० विषय सीबीएसईच्या दृष्टीने अधिक महत्वाचे आहेत. त्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, व्यवसाय अध्ययन, भूगोल, अर्थशास्त्र, इंग्रजी आदी विषय येतात. सीबीएसईने दिलेल्या दुसºया प्रस्तावाप्रमाणे १२वीतील महत्वाच्या विषयांची परीक्षा विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणसंस्थांतूनच (सेल्फ सेंटर) द्यायला सांगायचे. या परीक्षा तीन तासांऐवजी दीड तासांच्या असाव्यात.