उत्खननात सापडले 1000 वर्षे जुने शिव मंदिर आणि परमार कालीन शिलालेख
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 11:26 AM2022-02-14T11:26:45+5:302022-02-14T11:26:53+5:30
मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये पुरातत्व विभागाला हे 1000 वर्षे जुने शिवमंदिर सापडले आहे.
उज्जैन:मध्य प्रदेशच्याउज्जैनमध्ये पुरातत्व विभागाला 1000 वर्षे जुने शिवमंदिर सापडले आहे. उज्जैनपासून 35 किमी अंतरावर असलेल्या कलमोरा येथे पुरातत्व विभागाच्या उत्खनननात शिव मंदिराचे गर्भगृह आढळले. उत्खननात मोठे शिवलिंगही दिसून आले आहे. पुरातत्व आयुक्तांच्या निर्देशानुसार भोपाळ येथील डॉ. वाकणकर पुरातत्व संशोधन संस्थेकडून सुरू असलेल्या उत्खननात हा वारसा सापडला आहे.
वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या उत्खननादरम्यान या परिसरात गर्भगृह असू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, या उत्खनननात सापडलेले मंदिर हजार वर्षे जुने आणि परमार काळातील आहे. पुरातत्कव अधिकाऱ्यांना यावेळी काही शिलालेखही आढळून आले आहेत, ज्यावर भगवान शिव, विष्णू, नंदी यांच्या कोरीव मुर्ती आहेत.
मोठ्या आकाराचे शिवलिंक दिसले
भोपाळच्या टीमने या संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण केले आणि सर्वेक्षणानंतर पुरातत्व संशोधन अधिकारी डॉ.धुर्वेंद्र जोधा यांच्या निर्देशानुसार येथे उत्खनन सुरू करण्यात आले. उत्खनननादरम्यान हितेश जोझा, अंकित पाटीदार, राहुल पाटीदार आदी अभ्यासकांच्या चमूने गर्भगृह शोधले. या ठिकाणी एक मोठे शिवलिंगही सापडले आहे.
मंदिराच्या अवशेषांसोबत शिलालेख सापडले
डॉ. धुर्वेंद्र जोधा यांनी सांगितले की, उत्खननादरम्यान सापडलेल्या मंदिराची लांबी सुमारे 15 मीटर आहे. अजून उत्खननाचे काम बाकी असून, हे त्यावेळचे फार मोठे मंदिर असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. डॉ. जोधा म्हणाले की, कलमोरा येथे कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे उत्खननाचे काम मध्येच थांबवावे लागले होते. आता काम सुरू झाल्यानंतर मंदिरातील गर्भगृह प्राप्त झाले आहे. परमार काळातील मंदिराच्या अवशेषांमध्ये कलश, शिलालेख आणि इतर बऱ्याच वस्तू सापडल्या आहेत.
मंदिराची रहस्ये जमिनीत गाडली आहेत
उत्खननादरम्यान सापडलेल्या पूर्वाभिमुख शिवमंदिरात संपूर्ण मंदिर गाडलेले आढळले. पूर्व, दक्षिण आणि उत्तरेचा मार्ग मोकळा झाला आहे. पश्चिम भाग बाकी आहे. या ठिकाणी अजून उत्खनन केले जाणार असून, हे मोठे मंदिर असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्खनन पूर्ण झाल्यानंतरच या मंदिराची गुपितं समोर येऊ शकतात.