नवी दिल्ली : दिल्लीला गरजेपेक्षा अतिरिक्त ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. मात्र त्याचा अकार्यक्षमतेने वापर सुरू आहे. दिल्लीत ऑक्सिजनच्या जादा साठ्याची काळ्या बाजारात विक्री केली जाते, असा खळबळजनक आरोप केंद्र सरकारने केला आहे.केंद्र सरकारच्या यंत्रणांनी दिल्लीतील ६२ महत्त्वाची शासकीय रुग्णालये तसेच ११ ऑक्सिजन भरणा केंद्रांमध्ये नुकतेच एक सर्वेक्षण केले. त्यात असे आढळून आले की, दिल्लीतील ऑक्सिजनचा जादा साठा दुसरीकडे वळविला जात असल्याने त्याचे परिणाम या वायूच्या राष्ट्रीय स्तरावरील वितरणावरही होत आहेत. दिल्लीला असलेली ऑक्सिजनची गरज, त्या वायूचे वितरण व प्रत्यक्ष वापर याची काटेकोर तपासणी करून घेण्यासाठी केजरीवाल सरकार राजी नाही, असे केंद्र सरकारच्या सूत्रांनी सांगितले.दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होऊनही जर त्या वायूची कमतरता जाणवत असेल तर याचा अर्थ दिल्ली सरकारमधील मंत्री काहीतरी गडबड करत असावेत, असा केंद्र सरकारचा आरोप आहे. दिल्लीतील ऑक्सिजन सिलिंडर ताब्यात ठेवल्याबद्दल तेथील अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री इम्रान हुसैन यांना दिल्ली उच्च न्यायालयाने नोटीस बजावली होती.
पुरवठ्यामध्ये ५० टक्के वाढकेंद्र सरकारच्या सर्वेक्षणानुसार दिल्लीतील रुग्णालये तसेच भरणा केंद्रातील ऑक्सिजनचे प्रमाण गेल्या दोन दिवसांत ५० टक्क्यांनी वाढविण्यात आले आहे. सध्या दररोजच्या गरजेपेक्षा १.२ पट ऑक्सिजनचा साठा दिल्लीत उपलब्ध आहे. काही रुग्णालयांकडे चार-पाच दिवस पुरेल इतका ऑक्सिजन आहे. ५ मेपासून ऑक्सिजनचा तुटवडा आहे अशी एकही तक्रार संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत आलेली नाही. दिल्लीचे अनुकरण करत राजस्थान, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर या राज्यांनीही ऑक्सिजनचा अधिक प्रमाणात पुरवठा करावा, अशी मागणी केंद्राकडे केली होती.