लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोनाच्या धास्तीने वारंवार ‘सिटी स्कॅन’ करणाऱ्या बाधितांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी धोक्याचा इशारा दिला आहे. एकदा ‘सिटी स्कॅन’ करणे ३०० ते ४०० वेळा छातीची क्ष-किरण तपासणी करण्यासारखे असून, त्यामुळे भविष्यात कर्करोग होण्याचा धोका उद्भवतो, असे सांगत डॉ. गुलेरिया यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले आहे. देशात दररोज तीन लाखांहून अधिक कोरोनाबाधित आढळून येत आहेत. कोरोनाकहरामुळे भांबावलेली जनता कोरोनाची थोडी जरी लक्षणे आढळली तरी ‘सिटी स्कॅन’ करून घेत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर डॉ. गुलेरिया यांनी वरीलप्रमाणे इशारा दिला. ते म्हणाले की, ‘सिटी स्कॅन’ आणि बायोमार्कर्स या सुविधांचा गैरवापर होत असून, ज्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत त्यांना या चाचण्या करण्याची काहीही गरज नाही. ज्या बाधितांची ऑक्सिजन पातळी कमी आहे, ज्यांच्यात लक्षणे तीव्र आहेत अशांसाठीच ‘सिटी स्कॅन’ योग्य ठरते.
रेमडेसिविर आणि स्टेरॉइडपासून सावधडॉ. गुलेरिया यांनी रेमडेसिविर आणि स्टेरॉइड्ससंदर्भातही खबरदारी बाळगण्याची सूचना यावेळी केली. ते म्हणाले की, कोरोना विषाणूचा संसर्ग अतिप्रमाणात झाला असेल. फुप्फुसांपर्यंत संसर्ग झाला असेल तरच या दोन्ही उपचारांची गरज भासते. कोरोनाबाधितांच्या उपचारांत पहिल्याच टप्प्यात रेमडेसिविर आणि स्टेरॉइड्स दिल्यास त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो, असे डॉ. गुलेरिया म्हणाले.
कोरोनाविरोधात आता वैद्यकीय शाखेचे विद्यार्थीलढाईला बळकटी मिळावी यासाठी आता वैद्यकीय शाखेच्या अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांच्या सेवा घेण्यात येणार असून वैद्यकीयच्या पदव्युत्तर पदवी परीक्षेलाही चार महिन्यांची स्थगिती देण्यात आली आहे. तसेच नर्सिंगचे प्रशिक्षण घेणाऱ्या परिचारिकांचीही कोरोनालढ्यात मदत घेण्यात येणार आहे. वैद्यकीय तज्ज्ञ, परिचारिका तसेच वैद्यक क्षेत्रातील अनेक रिक्त पदे येत्या ४५ दिवसांत भरणार आहेत. कोरोनाबाधितांच्या उपचारांत पहिल्याच टप्प्यात रेमडेसिविर आणि स्टेरॉइड्स दिल्यास त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो, असे डॉ. गुलेरिया म्हणाले.
क्ष-किरण तपासणी करा nएक ‘सिटी स्कॅन’ ३०० ते ४०० क्ष-किरण तपासण्यांसमान असून, त्यामुळे कर्करोग होण्याचा धोका असतो. तेव्हा ज्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत त्यांनी ‘सिटी स्कॅन’ न करता छातीची क्ष-किरण तपासणी करावी. सौम्य लक्षणे असलेल्या बाधितांच्या रक्त तपासणीचीही काहीच गरज नाही. nऑक्सिजन पातळी चांगली असलेल्यांनी घरीच विलगीकरणात राहून पथ्य पाळल्यास कोरोना बरा होतो, असे सांगत ‘सिटी स्कॅन’पासून दूर राहण्याचे आवाहन डॉ. गुलेरिया यांनी केले.