इअरफोनवर अनेकांना तासनतास गाणी ऐकायची सवय असते. मात्र या सवयींचा एका तरुणाला मोठा फटका बसला. कानात इन्फेक्शन झालं आणि ऐकण्याची क्षमताही कमी झाली. पण हे समजेपर्यंत खूप उशीर झाला होता. तरुणाची ऐकण्याची क्षमता 60% कमी झाली. दोन शस्त्रक्रिया करूनही काही फायदा होत नसल्याने या तरुणाने दिल्ली गाठली आणि नंतर गांभीर्य दाखवत इम्प्लांट लावून ऐकण्याची क्षमता परत आणण्यात डॉक्टरांना यश आले.
तुम्ही संगीत ऐकत असाल किंवा कॉलवर बोलत असाल तर दोन ते तीन तासांपेक्षा जास्त काळ इअरफोन वापरू नका, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यापेक्षा जास्त वापर केल्यास ते ऐकण्याच्या क्षमतेसाठी धोकादायक ठरू शकते. प्राइमस हॉस्पिटलचे ईएनटी तज्ज्ञ डॉ. अंकुश सायल यांनी सांगितले की, 18 वर्षांचा तरुण रोज 8 ते 10 तास इअरफोनवर गाणी ऐकत असे. तो त्याचे इअरफोन त्याच्या मित्रांनाही शेअर करत असे. त्यामुळे कानात संसर्ग झाला होता. तो इअरफोन लावायचा तेव्हा कान बंद व्हायचे. यामुळे कानात बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते.
सुरुवातीला फक्त कानात वेदना होत होत्या, पण नंतर कानातून पल्स बाहेर यायला लागला. मूळचा यूपी मधील गोरखपूरचा रहिवासी असलेल्या या रुग्णावर या काळात स्थानिक रुग्णालयात दोनदा शस्त्रक्रियाही झाल्या, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. डॉ.अंकुश सायल यांनी सांगितले की, तरुणाला रिपोर्टच्या आधारे अँटिबायोटिक्स देण्यात आली. त्यानंतर सिटी स्कॅन करण्यात आले. मागील शस्त्रक्रियेतून कानात काही गोष्टी शिल्लक असल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांनी मास्टोइडेक्टॉमीद्वारे कान स्वच्छ केले.
श्रवण क्षमता पुनर्संचयित करण्यासाठी जर्मनीमध्ये तयार केलेले टायटॅनियम इम्प्लांट केले मग ऐकण्याची क्षमता परत आली. संपूर्ण उपचारासाठी सुमारे दीड लाख रुपये खर्च आला. डॉक्टरांनी सांगितले की, तरुण अनेकदा आमच्याकडे अशा समस्येने त्रस्त असतात, कारण हे लोक दिवसभर इअरफोन वापरतात. त्यांना हे माहीत नसते की, इअरफोन सतत जास्त वेळ वापरणे घातक ठरू शकतं. यामुळे गंभीर नुकसान होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.