नवी दिल्ली : भारत व पाकिस्तानने आपापल्या अणुप्रकल्पांच्या यादीची रविवारी देवाण-घेवाण केली. कितीही मोठा संघर्ष उद्भवला तरी दोन्ही देशांनी परस्परांच्या अणुप्रकल्पांवर हल्ला करायचा नाही, असे एका कराराद्वारे ठरविण्यात आले होते.दोन्ही देशांनी एकमेकांच्या अणुप्रकल्पांवर हल्ले करायचे नाहीत, असा करार करण्यात आला होता. भारत, पाकिस्तान १ जानेवारी १९९२ पासून आपापल्या अणुप्रकल्पांच्या यादीची देवाण-घेवाण करतात. गेल्या तीन दशकांपासून दरवर्षी १ जानेवारीला या गोष्टीचे पालन केले जाते. पाकिस्तानमधील अणुप्रकल्पांची यादी त्या देशाच्या अधिकाऱ्याने इस्लामाबाद येथील भारतीय राजदूतावासाला रविवारी सादर केली, तसेच भारतातील अणुप्रकल्पांची यादी पाकिस्तानच्या दिल्लीतील राजदूतावासाला सादर करण्यात आली आहे. पाकिस्तानातून भारतात दहशतवादी कारवाया होत असतात. काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तान भारताची कुरापत काढत असतो. या गोष्टींमुळे दोन्ही देशात तणाव निर्माण झाला आहे. मात्र या गोष्टींचा अणुप्रकल्पांची यादी परस्परांना देण्याच्या कृतीवर काहीही परिणाम झालेला नाही. (वृत्तसंस्था)
‘६३१ भारतीय मच्छीमार, दोन नागरिकांची पाकिस्तानी तुरुंगातून मुक्तता करा’पाकिस्तानने ६३१ भारतीय मच्छीमार व दोन नागरिकांची तुरुंगातून मुक्तता करून त्यांची भारतामध्ये पाठवणी करावी. या कैद्यांनी त्यांच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण केला आहे, असे भारताने म्हटले आहे. त्याशिवाय आणखी ३० भारतीय मच्छीमार व २२ नागरिक पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत पडले असून, त्यांना भेटण्याची परवानगी भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना द्यावी, असेही भारताने पाकिस्तानला सांगितले आहे.
३९ पाकिस्तानी नागरिक, ९५ मच्छीमार भारतातील तुरुंगात ३ कैदभारत-पाकिस्तानने परस्परांचे नागरिक कैद केले असून, त्यांच्या यादीची दरवर्षी १ जानेवारी व १ जुलैला देवाण-घेवाण करण्यात येते. भारतीय तुरुंगात सध्या ९५ पाकिस्तानी मच्छीमार व ३३९ नागरिक आहेत. आपापल्या नागरिकांची तुरुंगातून लवकर सुटका व्हावी म्हणून दोन्ही देश प्रयत्नशील असतात.