West Bengal Assembly Election: ममतांच्या ऑडिओ क्लिपमुळे खळबळ; अधिकारींच्या निकटवर्तीयाला फोन करून मदत मागितली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 05:51 AM2021-03-28T05:51:40+5:302021-03-28T05:52:04+5:30
भाजपचा दावा, भाजप सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांच्या नेतृत्वात पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली व त्यांना क्लिप सोपविली.
कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणात ममता बॅनर्जी यांच्या कथित ऑडियो क्लिपमुळे खळबळ माजली आहे. नंदीग्राम येथे ममता यांच्याविरोधात उभे असलेले भाजपचे उमेदवार शुभेंदु अधिकारी यांचे निकटवर्तीय असलेले प्रलय पाल यांना ममता यांनी फोन लावला व जिंकण्यास मदत करण्यासाठी मदत मागितल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.
भाजप सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांच्या नेतृत्वात पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली व त्यांना क्लिप सोपविली. विधानसभा निवडणुकांना प्रभावित करण्यासाठी ममता आपल्या पदाचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप भाजपने लावला आहे. दुसरीकडे सत्ताधारी तृणमूलने या ऑडियो क्लिपवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ही क्लिप खरी असल्याचे स्पष्ट झालेले नाही. प्रलय पाल हे तृणमूलचे माजी पदाधिकारी होते. जर बॅनर्जी त्यांना परत पक्षात परत येण्यासंदर्भात म्हणत असतील, तर त्यात चुकीचे काय आहे, असे तृणमूलचे प्रवक्ता कुणाल घोष यांनी सांगितले.
काय आहे क्लिपमध्ये ?
पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी पाल यांना बॅनर्जी यांनी संपर्क केल्याचा दावा भाजपने केला आहे. नंदीग्राममध्ये विजय मिळविण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे. तुमची काही नाराजी आहे, हे मला माहिती आहे. मात्र, यातील बहुतांश तक्रारी अधिकारी कुटुंबामुळे आहेत. त्यांनी मला कधी नंदीग्राम किंवा पूर्व मिदनापूरमध्ये येऊ दिले नाही. यानंतर मी या बाबींची काळजी घेईल, असे ऑडियो क्लिपमध्ये ऐकू येत आहे.