केरळमध्ये कोरोनाचा JN.1 सबव्हेरिएंट सापडल्याने खळबळ, केंद्र सरकारने दिली महत्त्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 10:06 PM2023-12-16T22:06:23+5:302023-12-16T22:06:38+5:30
Corona Virus: केरळमध्ये कोविड-१९चा सब-व्हेरिएंट जेएन.१चा एक रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. परिस्थितीवर पूर्ण लक्ष असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
केरळमध्ये कोविड-१९चा सब-व्हेरिएंट जेएन.१चा एक रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. परिस्थितीवर पूर्ण लक्ष असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. केंद्र सरकारने सांगितले की, भारतीय सार्स कोव्ह-२ जिनोमिकी संस्थेने नियमित तपासणीदरम्यान, केरळमध्ये कोरोना विषाणूचा एक सबव्हेरिएंट असलेल्या जेएन.१ चा एक रुग्ण शोधला आहे. सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णालयाच्या तयारीच्या उपायांचं आकलन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नियमित अभ्यासादरम्यान राज्यामध्ये सर्व सर्व सुविधांची मॉकड्रील आयोजित करण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय राज्य आरोग्य अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. तसेच परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
केरळमध्ये आठ डिसेंबर रोजी कोविड-१९ चा सबव्हेरिएंट असलेल्या जेएन.१ चा एक रुग्ण सापडल्याची अधिकृत सूत्रांनी शनिवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ७९ महिलेच्या नमुन्याची १८ डिसेंबर रोजी आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली होती. त्यात तिला संसर्ग झाल्याचे दिसून आले. या महिलेमध्ये इन्फ्लूएंझासारख्या आजारांची सौम्य लक्षणे होती, तसेच ती कोविड-१९ च्या संसर्गामधून बरी झाली आहे.
सूत्रांनी सांगितले की, देशामध्ये कोविड-१९ चे सध्या सापडलेले ९० टक्के गंभीर नाही आहेत. तसेच संसर्ग झालेले लोक त्यांच्या घरांमध्येच विलगीकरणामध्ये राहत आहेत. यापूर्वी सिंगापूरमध्ये एका भारतीय प्रवाशामध्ये जेएन.१ चा संसर्ग सापडला होता. ही व्यक्ती मुळची तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहे. तसेच त्याने २५ ऑक्टोबर रोजी सिंगापूरचा दौरा केला होता.