लुधियाना (पंजाब) : येथील प्रसिद्ध पकोडा केंद्र ‘पन्नासिंग पकोडावाला’वर प्राप्तिकर विभागाने छापा मारल्यामुळे सनसनाटी निर्माण झाली आहे. ‘पन्नासिंग पकोडावाला’चे नेमके उत्पन्न किती, याचा शोध घेण्यासाठी ही तपासणी करण्यात येत असल्याचे प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
लुधियानाच्या गिल रोडवर कित्येक दशकांपासून पन्नासिंगचे पकोडा शॉप आहे. अलीकडेच मॉडेल टाऊनमध्ये त्याचे नवे आधुनिक आऊटलेट उघडण्यात आले आहे. येथे किट्टी पार्ट्यांचेही आयोजन होते. प्रधान प्राप्तिकर आयुक्त डी.एस. चौधरी यांच्या आदेशानुसार आयकर विभागाच्या विविध पथकांनी दुकानावर छापे मारले. रेंज-४ चे सहआयुक्त अपुल जैस्वाल यांनी सांगितले की, पकोडा विक्री केंद्रे आणि पकोडा संस्था (पकोडा फर्म), अशा दोन्ही ठिकाणी प्राप्तिकर खात्याची छापेमारी सुरू आहे.सूत्रांनी सांगितले की, पकोडा केंद्र चालकाकडून खरे उत्पन्न दडविले जात असल्याची ठोस माहिती मिळाल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली. जोपर्यंत तपासणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत नेमका किती प्राप्तिकर चुकविण्यात आला याची माहिती मिळू शकणार नाही. संस्थेचे वित्तीय रेकॉर्ड तपासले जात आहे. गुरुवारी प्राप्तिकर विभागाने आपला एक अधिकारी शॉपच्या काऊंटरवर तैनात करून रोज नेमकी किती विक्री होते, याची माहिती घेतली. (वृत्तसंस्था)